घरकुलासाठी वाढीव निधी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 05:00 AM2020-10-24T05:00:00+5:302020-10-24T05:00:28+5:30
जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ लक्षात घेता प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडसत्र दाबून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशावेळी रेती उपलब्ध नसल्याने अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण आहेत. उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, शबरी आवास योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सातही तालुक्यात घरकुलांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. कुठे लाभार्थ्याला निधी तर कुणाला बांधकामाची मंजुरीच न मिळाल्याने अनेका लाभार्थ्यांचे घरकुल बांधण्याचे स्वप्न अधांतरी आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना इंदिरा गांधी आवास योजना यासह अन्य काही योजनेच्या अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना ही योजना मंजूर करण्यात आली आहे मात्र निधी अपुरा पडत असल्याने अनेकांना घरकुल पूर्ण कसे करायचे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ लक्षात घेता प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडसत्र दाबून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशावेळी रेती उपलब्ध नसल्याने अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण आहेत. उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, शबरी आवास योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम अंतिम टप्प्यात असले तरी एका टप्प्याचा निधी न मिळाल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले आहेत. कुणाचे नाव आले तर निधीचा थांगपत्ता नाही. अशावेळी काम सुरू तरी कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अनेक घरकुल यादीमध्ये गोडबंगाल असून त्यांच्या नावावर आधी स्वतःचे घर आहे असे महाभागांना घरकुल योजनेचा लाभ मिळाल्याचे समोर येत आहे. खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याचीही ओरड होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसह अन्य दोन योजनेमध्ये लाभार्थ्यांना दीड ते अडीच लाखांपर्यंत निधी बांधकामासाठी मिळत असतो. मात्र वाढत्या महागाईनुसार घरकुलाचे बांधकाम करणे परवडण्यासारखे नाही अडीच लाखांचा निधी कोकडा पडत असतो. शामुळे घरकुलासाठी वाढीव अनुदान देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
निधी पडतो अपुरा
घरकुल लाभार्थ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला वाढीव निधी देण्याबाबत अवगत केले आहे. मात्र लाभार्थ्याच्या भावनेची अजूनपर्यंत कदर झालेली नाही. वाढीव अनुदान करून दिल्यास अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल यात शंका नाही. एकट्या भंडारा तालुक्यातील गणेशपुर जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक घरकुलांची कामे याच्यामुळे रखडलेली आहेत तर काही घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत यासंदर्भात गणेशपुर येथील आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांनी घरकुलांच्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान द्यावे अशी मागणीं केली आहे.
भंडारा तालुका अंतर्गत गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रात जवळपास १७ हजार लोकसंख्या आहे. यात गणेशपूर येथे आठ हजार १४८, पिंडकेपार ८५२, बेला एक हजार१९६, दवडीपार या गावाची लोकसंख्या १,.३२२ इतकी आहे. लोकसंख्येच्या अनुषंगाने घरकुल लाभार्थ्यांची समस्या सुटलेली नाही. अनेकांना शासनातर्फे मिळणारा घरकुल निधी तोकडा आहे. शासनाने यात वाढ करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
-पवन मस्के, अध्यक्ष,
आदर्श युवा मंच गणेशपुर