आगरात बांबू नाही, बाहेर दुप्पट भाव, पोट भरायचे कसे? कारागिरांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2022 03:17 PM2022-05-18T15:17:14+5:302022-05-18T15:25:24+5:30

आगरातून बांबूचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रती बांबू विकत घ्यावा लागतो. परिणामी व्यवसायातून उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही.

no bamboo available in depot, double rate in outside, Bamboo artisans have to live a life of neglect | आगरात बांबू नाही, बाहेर दुप्पट भाव, पोट भरायचे कसे? कारागिरांची व्यथा

आगरात बांबू नाही, बाहेर दुप्पट भाव, पोट भरायचे कसे? कारागिरांची व्यथा

Next
ठळक मुद्देबांबूचा पुरवठा करा, हमी भावाने खरेदी व पेंशनची मागणी

युवराज गोमासे

भंडारा : आगरात बांबू नाही, बाहेरून खरेदी करताना दुप्पट भाव. प्लास्टिकच्या वस्तूच्या अधिक वापराने बांबूच्या वस्तूंना ग्राहकच मिळेना. कोरोनातून सावरत नाही तोच महागाईचा फटका, आता आम्ही पोट तरी कसे भरावे, ना इलाजाने रोजगार हमीच्या कामावर जाण्याची वेळी आली, अशी व्यथा मोहाडी तालुक्यातील पालोराचे बांबू कारागीर सांगत होते. ही अवस्था एकट्या पालोराचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांची आहे.

वनविभागाच्या आगारातून हमी भावाने कारागीर बांबूची खरेदी करतात. त्यापासून टोपले, सुप, पड्डे, ताटवे, चटई, ढोली, मासेमारीसाठी ढुटी, पंखे यासह विविध वस्तू तयार केल्या जातात. आगरातून कार्डधारक व्यावसायिकांना २० ते २२ फूट लांबीचा बांबू २५ ते ३० रुपयांच्या हमी भावात मिळायचा. मात्र ३० जून २०२१ पासून तुमसर वन विभागाच्या पालोरा आगरात बांबू नाही. कार्डधारकांकडून वारंवार मागणी करूनही पुरवठा होत नाही. कोरोना काळापासून बांबू व्यवसाय कमालीचा रोडावला. कोरोना काळात आठवडी बाजार बंदचाही फटका बसला. त्यातच घराघरात प्लास्टिक वस्तूंचा वापर वाढीस लागल्याने व्यवसाय कमालीचा अडचणीत सापडला आहे. वस्तू विकल्या जात नाही. खर्चाधारित भावही मिळत नाही. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

आगरातून बांबूचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांकडून ५० रुपये प्रती बांबू विकत घ्यावा लागतो. परिणामी व्यवसायातून उत्पन्न व खर्चाचा मेळ बसत नाही. आठवडी बाजार, शेजारील गावात फेरी मारून ५० ते ३०० रुपयांपर्यंत वस्तूंना भाव मिळतो. पोट भरण्यापुरताही पैसा उपलब्ध होत नाही. त्यातच कीड व अधिक खडे असलेला व निस्तार बांबूमुळे नुकसान अधिक असते, अशी कैफियत बांबू कारागिरांनी मांडली.

जिल्ह्यात बांबू व्यवसायातील गावे

जिल्ह्यात भंडारा, मेंढा, अडयाळ, पालोरा, लाखनी, साकोली, बारव्हा, मुंढरी, माटोरा, सुकळी, मानगाव आदी गावात हा व्यवसाय केला जातो. ठेकेदाराच्या माध्यमातून वरठी रेल्वेस्थानकावरून नागपूर शहरात मालाचा पुरवठा केला जातो.

कार्डधारक बांबू कारागिरांना उपेक्षितांचे जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे विडी कारागिरांप्रमाणे पेंशनचा लाभ देण्यात यावा, औषधोपचारासाठी मोफत सुविधा मिळावी, कोरोना काळातील नुकसान भरपाई देण्यात यावी.

- हरिश्चंद्र कोडापे, बांबू कारागीर पालोरा.

पालाेरा येथील बांबू आगरात वेळेत व हमी भावात वनविभागाने बांबू उपलब्ध करून द्यावा, हस्तकलेच्या वस्तुंची शासनाने हमी भावा खरेदी केल्यास फायदा होईल.

- बाबुलाल कोडापे, बांबू कारागिर पालोरा.

Web Title: no bamboo available in depot, double rate in outside, Bamboo artisans have to live a life of neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.