चाॅकलेट नको, मला सॅनिटायझर हवे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 05:00 AM2021-02-08T05:00:00+5:302021-02-08T05:00:42+5:30
तब्बल सहा महिन्यानंतर शाळा सुरु झाल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत होता. मात्र कोरोना संसर्गाची भीती मनात कायम असताना राज्य शासनाने नियमही घालून दिले. यात फिजीकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थी पालकांमध्येही याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग केली जाऊ लागली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुुरु झाल्यानंतर आता विद्यार्थी आपल्या आई-बाबांकडे चाॅकलेट पेक्षा मला सॅनिटायझर आणून द्या अशी मागणी करताना दिसताना दिसत आहेत. हा हट्ट नसून पाल्यांच्या सुरक्षेची बाब असल्याने पालकही ही बाब पूर्ण करुन देत असल्याचे चित्र आहे.
तब्बल सहा महिन्यानंतर शाळा सुरु झाल्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत होता. मात्र कोरोना संसर्गाची भीती मनात कायम असताना राज्य शासनाने नियमही घालून दिले. यात फिजीकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थी पालकांमध्येही याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग केली जाऊ लागली. विशेष म्हणजे या कोरोनासंकटकाळाच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांची कुठलीही चाचणी करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना संसर्गाचा धोका तर उद्भवणार नाही असा सवालही उपस्थित होत होता. एखाद्या विद्यार्थ्यांला कोरोनाची बाधा झाल्यास त्याचा प्रभाव अन्य विद्यार्थ्यांना बसेल अशी काळजी असतानाच शाळा सुरु होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अजूनपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांला कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाब उघडकीस आली नाही. ही एक जमेची बाजू ठरत आहे. कोरोना बाधितांची संख्याही हळूहळू कमी होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी जिल्ह्यात फक्त पाच जण कोरोनाबाधित आढळन आले आहेत. आता तर महाविद्यालयही सुरु होणार आहेत.
एकही बाधित नाही
जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या ७०९ शाळा आहेत. २७ जानेवारीला शाळा उघडण्यापूर्वी शिक्षकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळांमधील वर्गखोल्याही निर्जंतूकीकरण करण्यात आल्या. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना घाबरण्याचे कुठलेही कारण नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. आता हळूहळू सर्वच शाळा सुरु झाल्या असून विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचीही संख्या (हजेरी) वाढत आहे. विशेष म्हणजे चाचणी दरम्यान काही शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. मात्र आतापर्यंत कुठलाही विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेला नाही. दरम्यान शाळांमार्फत आवश्यक ती जनजागृती केली जात असल्याने विद्यार्थिही सुरक्षित असल्याची हमी दिसून येत आहे.
शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले. परंतु कोरोनाची कोणतीही भीती आता मनात राहिलेली नाही. शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच आमची थर्मल स्कॅनिंग होत आहे. शिक्षकगण वर्गात येऊन फिजीकल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. कुणी सॅनिटायझर आणले नसेल तर शाळेतूनच त्याला ते उपलब्ध करुन दिले जात आहेत. विद्यार्थी सुरक्षित राहिल असे सांगून त्यामुळे तुमचे शैक्षणिक कार्यात मन लागेल असे सांगितले जात आहे. आता चाॅकलेटपेक्षा सॅनिटायझर बॅगेत न्यावे लागत आहे.
-अथांग वासनिक, विद्यार्थी
शाळेत पहिल्याच दिवशी जाताना मास्क, सॅनिटायझर आवर्जून न विसरता घेऊन गेलो होतो. वर्गमित्रांनीही ही बाब प्रकर्षानेही मान्य करीत शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन केले. आता बॅगेत मास्क, सॅनिटायझर न विसरता घेऊन जात आहोत. मधल्या ब्रेकमध्ये याचा आम्ही वापर करतो. शाळा सुटण्याची वेळ लवकर असली तरी नियमांचे पालन केले जात आहे. फिजीकल डिस्टन्सिंग राखून आम्हाला अन्य बाबीही शिकविल्या जात आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनिंग होत आहे.
-सुजल पेशने, विद्यार्थी
शाळा सुरु झाल्याचा आनंद आहे. मात्र कोरोनामुळे आपण सुरक्षित राहू किंवा नाही याची थोडीफार भीती वाटत होती. आई-बाबांना मला शाळेत जाण्यापूर्वी सॅनिटायझर घेऊन जाणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. ही बाब माझ्यासाठी सुरक्षित असल्याने माझी ही मागणी पुर्णही करण्यात आली. आधिच कोरोना काळात स्वच्छ हात धुणे याची सवय लागली होती. आता शाळेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरक्षित वातावरणात अभ्यास करायला मिळत आहे. शाळा परिसरही स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात आल्याने आम्हाला आता कुठलीही भीती वाटत नाही. मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे. वेळोवेळी हात धुणे व मास्कचा वापर करावा असे सांगण्यात आले होते. आता आम्हाला कोरोनाची भीती वाटत नाही. मुक्तसंचार करण्यासारखे शाळेत आमचा नियमबद्ध वावर असतो.
-वेदांत कोटांगले, विद्यार्थी