न्यायापासून कोणीही सामान्य माणूस वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:42+5:302021-03-17T04:35:42+5:30
कोंढा-कोसरा : न्यायापासून कोणीही सामान्य माणूस वंचित राहू नये यासाठी विधि सल्ला केंद्र निर्माण केले आहे. हे सेवाभावी ...
कोंढा-कोसरा : न्यायापासून कोणीही सामान्य माणूस वंचित राहू नये यासाठी विधि सल्ला केंद्र निर्माण केले आहे. हे सेवाभावी काम आहे, तालुक्यातील सर्व गावांत याची माहिती पसरविण्याचे काम कायद्याचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांनी करावे, असे आवाहन न्यायाधीश नरेश वाळके यांनी केले. ‘डॉ. मिलिंद येरणे काॅलेज ऑफ लाॅ कोंढा येथे’ विधि सल्ला केंद्र, तसेच १५ जागतिक ग्राहक दिनानिमित्त उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला न्या. ए. आर. यादव, न्या. एस. एम. पाटील, पवनी वकील संघ अध्यक्ष ॲड. सुरेश तलमले, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद येळणे, प्राचार्या ॲड. साधना येळणे, सरपंच सुरेश कुर्झेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
न्या. वाळके म्हणाले, सर्वांचा विकास व्हावा यासाठी सामाजिक न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. घटनेने सर्वांना समान संधी, सन्मानाने जगण्याचा, आपले शरीर व संपत्तीचे रक्षण करण्याचा अधिकार दिला आहे. ज्यांच्याकडे साधन आहे तो न्यायालयात जाणार, पण ज्याच्यावर अन्याय झाला त्याला माहीत नाही, तेव्हा ज्याला काही कायदे माहीत आहे त्यांनी मदत करण्यासाठी सेवा केंद्रे निर्माण केली आहेत. याची माहिती सर्वत्र पोहोचविणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी न्यायमूर्ती नरेश वाळके यांच्या हस्ते विधिसेवा केंद्र, तसेच यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान जिल्हा कार्यालय, भंडारा याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास पवनी वकील संघ पदाधिकारी ॲड. महेंद्र गोसावी, ॲड. जनार्दन जिभकाटे, ॲड. बावणे, ॲड. सावरकर, ॲड. अंबादे, ॲड. शेंडे व लॉ कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मिंलिद येळणे लॉ कॉलेज कोंढातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्या ॲड. साधना येळणे यांनी केले. त्यांनी अशिक्षित लोकांना कायद्याचे ज्ञान नसते, त्यासाठी ग्रामीण भागात वकिलीचे शिक्षण मिळावे यासाठी कॉलेज स्थापन केले, असे सांगितले. संचालन ॲड. योगिराज सुखदेवे यांनी केले. आभार ॲड. सावरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.