ना सांत्वना, ना मायेच्या स्पर्शाचा आधार
By admin | Published: April 5, 2017 12:20 AM2017-04-05T00:20:14+5:302017-04-05T00:20:14+5:30
आयुष्यात सारे वादळ वारे अंगावर घेत ते गावातून स्थलांतरित झाले. अडचणी, जगण्याची जिद्द या आयुष्यात गरगर फिरत राहिले.
लोकमत मदतीचा हात : आभाळाच्या छत्रछायेत राहणाऱ्या धनराजला देवदूत गवसणार कां?
मोहाडी : आयुष्यात सारे वादळ वारे अंगावर घेत ते गावातून स्थलांतरित झाले. अडचणी, जगण्याची जिद्द या आयुष्यात गरगर फिरत राहिले. जीवनात त्यांच्या नशिबी वेदना, दु:खच आले. जीवनाची वेल खुरटत असताना कुणीतरी सांत्वना देईल. मायेच्या स्पर्शाचा आधार देईल, या आशेने आजही ते बघत आहेत. परंतु मायाच संवेदनाहीन झाल्याने निळे आभाळ मुठीत घेऊन जीवन कंठणारे कुटुंब, हक्काची जागा व घरकूल कधी मिळेल याची आस लावून बसले आहे.
गरीबीची जीवघेणी अवहेलना त्याची कास सोडत नाही. दोन घासाच्या अन्नासाठी त्यांना गाव सोडावं लागलं. नातेसंबंधांना पांगून तो मोहाडीत स्थिरावला. पण, आजही ते कुटुंब आशाळभूत नजरेने मायेच्या ओलाव्याची प्रतीक्षा करीत आहे. तब्बल २५ वर्षापासून तो हक्काची जागा व छोटसं घरकुल मिळावं यासाठी अनेकांपुढे हात पसरत आहे. मोहाडीत सुभाष वॉर्ड किंबहूना वाळीत टाकल्यागत गरीबीचे चटके सोसणारा धनराज नगरधने यांच्या परिवाराची हृदय हेलावून टाकणारे हे वास्तव आहे. जगणं संपन्न करण्यासाठी नात्यांचा ओलावा आवश्यक ठरतो. नाते विभक्त करताना क्लेश होतो. पण, नियती अन् परिस्थिती एकोपा तोडायला भाग पाडते. धनराजचेही असेच झाले.
मुंढरी खुर्द येथून तो दोन दशकापूर्वी बाहेर पडला. कारण होतं गरीबी. कान्हळगाव (सिर), मोरगाव याठिकाणी त्याने आश्रय शोधला. त्याला रोजगार अन् आधार फारसा मिळाला नाही. धनराज पत्नीसह मोहाडीत स्थिरावला. भाड्याच्या घरात राहून मजूरी करून जीवन पुढे ढकलत होता. या घरातून त्या घरी गरागरा फिरत राहिला. आपण भाड्याने किती दिवस राहू, हा प्रश्न त्याला सतावत असताना हक्काची जागा मिळेल या हेतूने काही वर्षापूर्वी सुभाष वॉर्डात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ झोपडी बांधली. नगरपंचायतीची निवडणुकीत भाडेकरूने (धनराज नगरधने) यांनी बाजूने मतदान केले नाही. या संशयावरून रात्रीच बाहेर काढले. रात्र कुठे काढणार? हा विचार येताच धनराजने संसाराचा पसारा घेत लेकराबाळांना झोपडीत आणले. आता तो त्याच झोपडीत स्थिरावला आहे. झोपडीला गवताचे पांघरुण, काड्या, कुडाच्या भिंती, आत एकच खोली, समोर स्वयंपाकाची जागा असा हा त्याचा निवारा. नदीकाठील मोकळे मैदान, डुकरांची वस्ती, झोपडीशेजारी पाण्याची टाकी, अंधारातील जीणे, वीज नाही, लुकलुकणारी दिव्यांच्या प्रकाशात आनंद मानणारा हा कुटुंब थंडी, वारा, उन्ह, पाऊस पाणी, वादळ सोसत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. विहिरीत श्वास रोखून, बुडी मारून तळचा दगड आणण्याची जिद्द ठेवणारी उर्मिला नावाची लेक शिक्षण घेत आहे. एक मुलगा मॅट्रीकला आहे. आईवडीलांची होणारी दमछाक, वेदना संपविण्यासाठी शिक्षण महत्वाचं असल्याच धनराजची पत्नी सांगत होती. आता आपली एकच आस मुलीनं शिकावे, मोठे व्हावे. फाटक्या झोपडीला हक्काचे स्थान यावे, एक सुंदर घरकूल बनावे अशी आशा आहे. गरीबांचे कुणी नसतात ती जाणीव त्यांना झालीय. नगर पंचायतीला निवेदन दिली. पण आजही त्याचा उपयोग झाला नाही.
२ मार्च मोहाडीत नाना पटोले यांचा जनता दरबार भरला. धनराजच्या मुलीने परिवाराची व्यथा मांडत. सर, आम्ही केव्हाही मरू शकतो हे वाक्य खासदारांच्या काळजाला लागले. सगळेच एक वेळ स्तब्ध झाले. खा.पटोलेंनी मदत करण्याचे आश्वासन दिले
निराधारांना मायेची सावली देण्याची, निस्वार्थ कर्म तेवढंच त्याग असेल तर मायेने आसवे पुसून जाण्याची उर्मी येते. पण इथे तर संवेदनाच मृत झाल्याने दुसऱ्यांच्या वेदना समजून त्यांना मदतीचा हात कोण देणार? धनराजचा चार जणांचा परिवार उपेक्षित जीवन जगत आहे. आता तरी मायेचा स्पर्श करून आधार देणारा कुणीतरी देवदूत गवसणार का? यांची त्यांना प्रतीक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)