टाकीला झाकणच नाही: साकोलीच्या एसटी आगारातील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 03:22 PM2024-06-27T15:22:12+5:302024-06-27T15:22:44+5:30
Bhandara : एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ, प्यायला मिळतेय दूषित पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भंडारा विभागात सहा आगार आहेत. यापैकी साकोली आगार सर्वांत जास्त नफा मिळवून देणारे आगार आहे. परंतु येथील कर्मचाऱ्यांना दुर्दैवाने अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे वाहन चालक व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तापमानामध्ये वाढ झालेली असते. त्यामुळे सर्वांना पिण्याचे थंड पाणी आवश्यक असते; परंतु येथील कर्मचारी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी शाखा व्यवस्थापकाने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळत नसल्यामुळे पाण्याची बॉटल घरूनच घेऊन यावे लागत आहे. आगारातर्फे कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. परंतु पाण्याची टाकी स्वच्छ नसल्यामुळे व टाकीला कुठलेही झाकण नसल्यामुळे टाकीमध्ये कचरा पडलेला असतो.
परिणामी, पाण्याची अस्वच्छता वाढली आहे. याबाबत आगारप्रमुखांना कर्मचाऱ्यांनी अनेकदा सांगितले; परंतु आगारप्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. पाण्याची टाकी अजूनही उघडीच व स्वच्छता न करता 'जैसे थे' स्थितीत आहे. अस्वच्छ पाणी कर्मचाऱ्यांना प्यावे लागत आहे. त्यामुळे कर्मचारी आजारी पडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न कायम आहे. शेकडो प्रवाशांना एसटीतर्फे सेवा दिली जाते; परंतु कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित नाही, असेच दिसून येत आहे. या संदर्भात आगार प्रमुखांसोबत संपर्क होऊ शकला नाही.
...तर जबाबदार कोण?
कर्मचारी स्वस्थ राहतील, तर प्रवासीही सुरक्षित राहतील, ही साधी गोष्ट अधिकाऱ्यांना अद्यापही समजलेली दिसत नाही. आरोग्य बिघडून एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी स्वच्छ करावी. टाकीला झाकण बसवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.