ना ड्युटीचे निश्चित तास... ना कुटुंबीयांसाठी मिळतोय वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:52+5:302021-05-27T04:36:52+5:30
युवराज गोमासे करडी (पालोरा) : कोरोना महामारीचा भयंकर दुष्परिणाम दुसऱ्या टप्प्यात मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पाहावयास मिळाला. परंतु अत्यंत ...
युवराज गोमासे
करडी (पालोरा) : कोरोना महामारीचा भयंकर दुष्परिणाम दुसऱ्या टप्प्यात मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात पाहावयास मिळाला. परंतु अत्यंत बिकट स्थितीतही करडी पोलिसांनी अपुरे मनुष्यबळ असतानाही १२ ते १४ तास काम केले. वेळप्रसंगी सहकाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळून कर्तव्य बजावले. त्यामुळे वेळेवर जेवण, झोप, स्वतःबरोबरच कुटुंबीयांचे आरोग्य व अन्य गरजा पूर्ण करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे पोलिसांत मानसिक ताण-तणावाची बाब प्रकर्षाने समोर येताना दिसून येत आहे.
करडी परिसरात २५ गावांचा समावेश आहे. सुमारे ४० हजार लोकसंख्या आहे. दोन कारखाने आणि चार बाजारपेठा आहेत. करडी पोलीस स्टेशनअंतर्गत दोन अधिकारी आणि ४७ अंमलदारांची पदे मंजूर आहेत. सध्या मंजूर पदांपैकी दोन अधिकारी आणि दोन चालकांसह २३ अंमलदार कार्यरत आहेत. यात पाच महिला पोलीस शिपायांचा समावेश आहे. कोरोना महामारी सुरू असताना परिसरात दारू, जुगार, चोरी, किरकोळ दुखापत, घरफोडी, अपघात, बलात्कार व अपहरण यासारखे गुन्हे पोलिसांचा ताण-तणाव वाढविण्यास कारणीभूत ठरले. अपुरे मनुष्यबळ, त्यातच कामाचा ताण, तर दुसरीकडे जिवाची भीती पोलिसांना सतावताना दिसत आहे.
कोरोना संकट काळाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेकांचे आधार हरविले. काहींचे कुटुंब मृत्यूच्या जबड्यात गेले. ना मायेचा हात फिरला, ना स्वकियांची सोबत मिळाली. अखेरचे दर्शनही मिळाले नाही. सर्वांना जिवाची भीती वाटत असताना करडी पोलिसांनी जनजागृती मोहीम २५ गावांत राबविली. अनेकांना मदतीचा हात दिला. आपद्ग्रस्त कुटुंबीयांच्या हाकेला धावले. १२ तास कर्तव्याचे असताना १४ ते १८ तास राबले. दिवसाबरोबरच रात्रगस्ती केल्या. अनेक गुन्ह्यांचा वेळेत तपास केला. परंतु या सर्व प्रकारात ना ड्युटीचे निश्चित तास राहिले, ना कुटुंबीयांना वेळ देता आला.
पोलिसांना भेडसावणाऱ्या समस्या...
करडी येथे पोलीस ठाणे असले तरी, येथे शासकीय वसाहत नाही. घर देता का घर, अशी विचारणा केल्यावरही वेळेत किरायाचे घर मिळत नाही. बायको, मुले शहरात, तर पोलीस नवरा गावात, अशी परिस्थिती आहे. शिक्षण, आरोग्य आणि इतर जीवनावश्यक गरजांसाठी वारंवार शहरांकडे धाव घ्यावी लागते वा इतर सहकाऱ्यांना कामे सांगावी लागतात.
बदल्यांमुळे वाढणार घोळ
पाच वर्षे पूर्ण झालेले १२ कर्मचारी बदली होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु येणारे कर्मचारी लहान पोलीस ठाण्यात रुजू होण्याच्या मानसिकतेत नसतात. त्यामुळे आणखी घोळ होण्याची शक्यता आतापासूनच व्यक्त होताना दिसत आहे.
अपुऱ्या जागेत कार्यालयीन कामकाज
सध्या करडी पोलिसांचे कामकाज चौकीसाठी बांधलेल्या इमारतीतून चालविले जात आहे. कामकाज वाढले, परंतु जागा न वाढल्याने, कोरोना संकटात जिथे सोशल डिस्टन्स ठेवण्याचा सल्ला दिला जातो, त्या पोलिसांनाच अपुऱ्या जागेत बसून कार्यभार चालवावा लागत आहे. नवीन पोलीस ठाणे व कर्मचारी वसाहतीचे आश्वासन हवेतच विरल्याचा आभास होताना दिसत आहे.
कोट
पोलीस विभागाच्यावतीने दोन वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याची इमारत व वसाहतीच्या बांधकामासाठी मोजमाप करण्यात आले होते. परंतु बांधकाम झाले नाही. करडी पोलीस स्टेशन येथे मंजूर पदांपेकी निम्मेच अंमलदार कार्यरत आहेत. कोरोना संकटात दगदग व ताण-तणाव वाढला आहे.
- विजय सलामे, सहायक पोलीस उपनिरीक्षक