मजूर मिळेना! शेतशिवारात यांत्रिक पद्धतीने धान कापणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:40+5:302021-05-19T04:36:40+5:30

पालांदूर : शेतमजुरांच्या टंचाईने मोठमोठे शेतकरी हातघाईस आले आहेत. गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही. धान ...

No labor! Mechanical harvesting of paddy in the field | मजूर मिळेना! शेतशिवारात यांत्रिक पद्धतीने धान कापणी

मजूर मिळेना! शेतशिवारात यांत्रिक पद्धतीने धान कापणी

Next

पालांदूर : शेतमजुरांच्या टंचाईने मोठमोठे शेतकरी हातघाईस आले आहेत. गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही. धान कापणीच्या हंगामात तर चक्क शेतकऱ्यांना कुटुंबासह राबण्याची वेळ येते. आता यावरही मात करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. कमी वेळात आणि मोजक्या मजुरांत धान कापणी करणारे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे. लाखनी तालुक्यातील मचारणा येथील लक्ष्मीकांत ठवकर यांनी आपल्या शेतात यांत्रिक पद्धतीने कापणी सुरू केली. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी आता परिसरातील शेतकरी येत असून, इतर शेतकऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळत आहे.

निसर्गाच्या दृष्टचक्राने कापणी योग्य धान भुईसपाट होत आहे. दररोज वादळवारा येत आहे. धान पिकाचे मोठे नुकसान होत आहे. कापणी करावी, तर मजूर टंचाईचा सामना प्रत्येक शेतकऱ्याला करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागांतर्गत महाडीबीटी योजनेंतर्गत योजना सुरू केलेली आहे. यात उत्साही व होतकरू शेतकरी सहभाग नोंदवित असून, स्वतःचा व शेतीचा विकास साधत आहेत. असाच एक प्रकार लाखनी तालुक्यातील मचारणा येथील उच्चशिक्षित शेतकरी लक्ष्मीकांत ठवकर यांनी सुरू केला. महाडीबीटी अंतर्गत कापणी यंत्र खरेदी करून स्वतःच्या शेतात धान कापणीचा श्रीगणेशा केलेला आहे. इतर राज्यांतून व जिल्ह्यातून मोठे धान कापणी, मळणी यंत्र शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर आहेत, परंतु दररोजच्या पावसाने जमीन ओली असल्याने मोठे मळणी वाहन शेतात जाणे अशक्य झाले आहे. आणखी पुढे दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. अशा कठीण प्रसंगात धान कापणी यंत्र सोयीचे झालेला आहे. अगदी सरळ रेषेत धान कापला जाऊन बांधणीसाठी सुलभता मिळत आहे.

कोट

धान कापणी यंत्र सुलभ आहे. एकराला दोन लीटर पेट्रोल लागतो. एका दिवसात तीन ते पाच एकरांतील धानाची कापणी होते. काही बिघाड झाल्यास गावातील दुचाकी दुरुस्त करणारा व्यक्ती ही मशीन दुरुस्त करू शकतो. कृषी विभागामार्फत महाडीबीटी योजनेने ही मशीन खरेदी केलेली आहे. माझ्याकडे उन्हाळी हंगाम १५ एकरांत लागवडीखाली आलेला आहे. एका एकराला कापणीच्या खर्चात १ हजार रुपयांची बचत शक्य आहे.

लक्ष्मीकांत ठवकर, प्रगतशील शेतकरी मचारणा

शेतकऱ्यांनी महाडीबीटी योजनेंतर्गत ऑनलाइन सहभाग नोंदवित, शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेशी एकनिष्ठ राहात स्वतःच्या शेतीला आधुनिक व नव्या तंत्राची जोड द्यावी. खर्चाची बचत अर्थात नफ्यात वाढ करण्याकरिता शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

गणपती पांडेगावकर, मंडळ कृषी अधिकारी, पालांदूर

Web Title: No labor! Mechanical harvesting of paddy in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.