आता काही झाले तरी विलीनीकरणाशिवाय माघार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:00 AM2021-11-26T05:00:00+5:302021-11-26T05:00:17+5:30
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वाहक प्रशांत लेंडारे व चालक विजय बांगर यांच्यासह उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा करून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे १ टक्के घरभाडे वाढ व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. या निर्णयावर एसटी कर्मचारी असंतुष्ट आहेत.
संतोष जाधवर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आता काही झाले तरी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार येथील एसटी कर्मचाऱ्यांनी केला असून, आपल्या आंदोलनावर ते ठाम आहेत. भंडारा आगारासमोर एसटी चालक, वाहक, यांत्रिकी विभागातील कर्मचारी २ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसले आहेत.
राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे वाहक प्रशांत लेंडारे व चालक विजय बांगर यांच्यासह उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा करून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे १ टक्के घरभाडे वाढ व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. या निर्णयावर एसटी कर्मचारी असंतुष्ट आहेत. भंडारा आगारासमोर सुरू असलेल्या आंदोलनात वाहक प्रशांत लेंडारे, चालक विजय बांगर, अरविंद शहारे, देवचंद वासनिक, राधेशाम खडसे, अनिल मेंहर, राजकुमार वडेट्टीवार, लोकेश धोटे, संजय शिंदे, मधुकर कवासे, राजेंद्र कानतोडे, जितेंद्र हजारे, गोपाल खेताडे, इंद्रपाल तामगाडगे, महिला वाहक संध्या मेश्राम, सुचिता सलामे, मीनल शहारे, अस्मिता वासनिक, जयश्री बडवाईक, सुनंदा काटकर, घाटोळकर, जयश्री बडवाईक, वर्षा ठोंबरे, संतोष ठवकर, उमेश तिरपुडे, अश्विनी वाहने, जिजा पगाडे सहभागी झाले आहेत.
अन् कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर
- भंडारा आगारासमोर उपोषणासाठी बसलेले चालक व वाहक आपल्या व्यथा मांडत होते. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. अनेक चालक - वाहक आपल्या समस्या मांडताना अल्पवेतन, मुक्कामी बसेसवर होणारी गैरसोय, महामंडळाने आतापर्यंतचे करार वेळेत पूर्ण केले नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली. कर्मचाऱ्यांची एकजूट विजय मिळवून देणार असल्याचे सांगितले.