अनुदानाची रक्कम भरूनही मोटारपंप नाही
By admin | Published: April 3, 2016 03:49 AM2016-04-03T03:49:47+5:302016-04-03T03:49:47+5:30
करडी येथील चार शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या कृषी मोटार पंपासाठी १०० टक्के रक्कम कर्ज काढून भरली.
कृषी विभागाचा अजब कारभार : करडी येथील शेतकऱ्यांना मनस्ताप
करडी (पालोरा) : करडी येथील चार शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या कृषी मोटार पंपासाठी १०० टक्के रक्कम कर्ज काढून भरली. परंतु कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ना मोटारपंप मिळाले, ना पैसे मिळाले. जिल्हा कृषी अधिक्षक यांनी प्रश्न मार्गी न लावता तालुक्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देत आहे.
कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सप्टेंबर २०१५ मध्ये करडी येथील राधेश्याम बाबूराव साठवणे, भूपेंद्र रविकांत साठवणे, सीयाराम जयराम साठवणे, रजनी पुरुषोत्तम सेलोकर यांनी कृषी मोटारपंपसाठी कृषी विभागाकडे अर्ज केला होता. सदर योजना ५० टक्के अनुदानाची आहे.
मात्र कृषी विभागाने शासनाच्या धोरणांचा हवाला देत लाभार्थ्यांकडून १०० टक्के म्हणजे २० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. रक्कम भरणा केल्यानंतर १५ दिवसात पंप देण्याचे आश्वासन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मात्र डिसेंबर २०१५ मध्ये १०० टक्के रक्कम भरूनही मोटारपंप शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही.
बाजारात त्याच पंपाची किंमत १० हजार रुपये असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ५० टक्के अनुदान मिळणार असल्याने योजनेत पैसे भरले. लवकरच पंप मिळणार असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर रक्कम भरण्यासाठी मित्रांकडून हातउसणवारीवर कर्ज काढले. परंतु त्यांना अजूनही लाभ मिळालेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यासंबंधाने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेशी प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकाशी भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पदरचे पैसे खर्च करून जिल्हा कृषी अधीक्षकांशी शेतकरी भेटले. मात्र प्रश्न सोडविण्यापेक्षा तुम्हीच पुरवठादार व तालुका कृषी अधिकाऱ्याशी बोलण्याचा सल्ला दिला. यामुळे शेतकऱ्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मोटारपंपची तातडीची गरज असताना ना पंप दिल्या जात आहेत, ना मागणी करूनही भरलेली रक्कम परत मिळत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाच्या अशा अजब कारभारामुळे विभागाप्रती नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)