स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2021 05:00 AM2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:08+5:30

महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्याच काळात भंडारा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारचे सर्व जुलमी व अन्य करणारे कायदे मोडणे हा मुख्य हेतू या सत्याग्रहाचा होता. मिठाप्रमाणे गवतावर इंग्रज सरकारने कर आकारला होता. त्याचा निषेध म्हणून सत्याग्रह करण्यात आला. ८ ऑगस्ट १९३० रोजी तुमसर जवळच्या चिचोली (गोबरवाही) येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.

No one built a pillar there, no fire or wind | स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

googlenewsNext

मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात, या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण यावी अशी अवस्था पूर्व विदर्भातील जंगल सत्याग्रहाच्या स्मारकाची झाली आहे. तुमसर तालुक्यातील चिचोली येथे ८ ऑगस्ट १९३० साली जंगल सत्याग्रह करण्यात आला. परंतु या सत्याग्रहस्थळी आता शासनाने लाकूड आगार उभारला आहे. या स्थळाचा शासनालाच काय जिल्ह्यातील नागरिकांनाही विसर पडला आहे. 
महात्मा गांधींच्या नेतृत्वात देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. त्याच काळात भंडारा जिल्ह्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती. ब्रिटिश सरकारचे सर्व जुलमी व अन्य करणारे कायदे मोडणे हा मुख्य हेतू या सत्याग्रहाचा होता. मिठाप्रमाणे गवतावर इंग्रज सरकारने कर आकारला होता. त्याचा निषेध म्हणून सत्याग्रह करण्यात आला. ८ ऑगस्ट १९३० रोजी तुमसर जवळच्या चिचोली (गोबरवाही) येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला. असंख्य नागरिक, स्त्रिया, मुले गवत कापण्यासाठी निघाले. दुपारी सत्याग्रहाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पोलिसांचा ताफा तेथे हजर होता. गवत कापायला सुरुवात केल्यावर सर्वांना अटक करण्यात आली. त्यानंतर खटले भरण्यात आले. खटल्याचे काम विनायक पेटकर व पळसुले या तरुण वकिलानी विनामूल्य चालविले. खटल्याच्या निकाल लागून बहुतेकांना शिक्षा झाली. जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व फुलचंदजी अग्रवाल, चतुर्भुज जसानी, जगन्नाथ पटवर्धन, सत्यनारायण खंडेलवाल, मोरेश्वर दामले यांनी केले होते.
तुमसरवरून अनेक कार्यकर्त्यांनी भंडारा येथे जाऊन जंगल लिलाव व दारू लिलाव यावर बहिष्कार व पीकेटिंग केले. यात पोलिसांनी लाठीमार व धरपकड सुरू केली. यात मो.प. दामले, वासुदेव कोंडेवार, कल्लू हलवाई, हरिश्चंद्र भोले, बालाजी पैलवान, बापू समरीत यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. 

जंगल सत्याग्रह स्थळ उपेक्षित
- जंगल सत्याग्रह चिंचोली गावाजवळ बघेडा फाटा परिसरात झाला होता. महाराष्ट्र शासनाने तिथे आता लाकडांचा आगार तयार केला आहे. आज तेथे हजारो लाकडे पडून आहेत. ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन पुकारणारे स्थळ आजही उपेक्षित असून त्याच्या कोणत्याही खुणा तिथे नाहीत. आजच्या तरुणांना या ठिकाणी काय घडले हे माहीत नाही. किमान शासनाने तिथे फलक लावून इतिहासाची माहिती देणारे स्मारक तयार करण्याची गरज आहे.

धरपकड करून कारागृहात डांबले
- भंडाऱ्याचे कलेक्टर व पोलीस अधीक्षकांनी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला होता. घोडेस्वार आणले होते. सत्याग्रहींना पकडल्यानंतर जमावाचे पुढारी कर्मवीर बापूजी पाठक, चतुर्भुज जसानी, गोपीचंद पाटील यांना अटक करण्यात आले. त्यांना पवनारच्या जंगल नाक्यात सर्वांना न्यायाधीशांनी शिक्षा दिली. त्यानंतर सर्वांना भंडारा येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तुमसरचे माकडे गुरुजी, बुधरामजी गुरुजी, वासुदेव कोंडेवार, प्रभाकरराव पेंढारकर, हरिश्चंद्र भोले अशा अनेक कार्यकर्त्यांना पकडून जेलमध्ये नेण्यात आले होते. १९३० अखेर सर्वांची जेलमधून सुटका झाली. 

 

Web Title: No one built a pillar there, no fire or wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.