आता कोणीच नाही राहणार उपाशी; केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:24+5:302021-05-28T04:26:24+5:30
भंडारा : कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकांच्या अनुषंगाने स्वस्त धान्य ...
भंडारा : कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन लाभार्थ्यांना शिधापत्रिकांच्या अनुषंगाने स्वस्त धान्य देण्यात येत आहे. आता जून महिन्यापासून केशरी कार्डधारकांनाही सवलतीत धान्य दिले जाणार आहे. याची घोषणाही राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी केली असून, याचा फायदा जिल्ह्यातील २६ हजार केशरी कार्डधारकांना मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि शेतकरी योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांनादेखील सवलतीत धान्य देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील २६ हजार ५९४ केशरी शिधापत्रिकाधारकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत राज्यात सध्या मोफत धान्याचे वितरण सुरू आहे. यापूर्वी मे महिन्यापासून सदर सवलतीत धान्य दिले जाणार होते, मात्र स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप न करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात दोन लक्ष ५७ हजार ६१२ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यात ६५ हजार ३९० बीपीएल कार्डधारक असून अंत्योदय योजनेचे एक लक्ष ६५ हजार ६२८ लाभार्थी आहेत. कोरोना परिस्थितीमुळे आता जिल्ह्यातील केशरी कार्डधारकांनाही सवलतीत धान्य दिले जाणार आहे.
बॉक्स
बीपीएलच्या ६५ हजार ३९० शिधापत्रिकाधारकांनाही लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत बीपीएलधारकांना प्रत्येक युनिटमागे दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ सवलतीमध्ये देण्यात येणार आहेत.