ना बसायला जागा, ना डोक्यावर छत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:30+5:302021-02-12T04:33:30+5:30

११ लोक ०६ के विशाल रणदिवे अड्याळ : भंडारा- पवनी महामार्गावरील अड्याळ येथील प्रवासी निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. ना ...

No place to sit, no roof over your head | ना बसायला जागा, ना डोक्यावर छत

ना बसायला जागा, ना डोक्यावर छत

Next

११ लोक ०६ के

विशाल रणदिवे

अड्याळ : भंडारा- पवनी महामार्गावरील अड्याळ येथील प्रवासी निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. ना बसायला जागा, ना डोक्यावर छत, ना सुविधा. यापूर्वी प्रवाशांना निदान उभ्या असलेल्या झाडाची तथा वर्गणी गोळा करून तयार झालेल्या मंडपाची तरी सावली मिळायची आणि त्यात कसेतरी प्रवासी उभे राहायचे; पण आज तेही उपलब्ध नाही. या ज्वलंत समस्येकडे कुणी लक्ष देणार काय, असा सवाल आहे.

प्रवासी उन्हात उभे राहताहेत याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पुन्हा यासाठी वर्गणी गोळा करून येथील शेड बांधायचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या; पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणी उन्हाचे वाढते तापमान याकरता आता विचार होणे गरजेचे झाले आहे.

अड्याळ बसथांबा परिसरात आधी पक्का प्रवासी निवारा होता. अतिक्रमण हटविण्यात आले तेव्हा तोही पाडण्यात आला. त्यानंतर पक्का प्रवासी निवारा बांधण्यात आला नाही. आज याठिकाणी रोज शेकडोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात; पण सुरक्षितता नाही. प्रवाशांना साधे उभे राहायला, बसायला, छतसुद्धा नाही. मग प्रवाशांनी उन्हात राहायचे कसे, त्यात वृद्ध व बालकांना त्याचा किती त्रास होतो आहे, याची जाणीव तरी कुणाला आहे का? असेही आज बोलले जात आहे.

आधी जे शेड होते, काही सिमेंट खुर्च्या होत्या, त्या गेल्या कुठे, हाही संशोधनाचा विषय आहे. कारण त्या खुर्च्या व शेड हे कुणी लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायत प्रशासनाचे नसून ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून केलेल्या पैशाने ती सर्व व्यवस्था केली होती, हेही सत्य आहे. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना जेव्हा तेथील नालीचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून तेथील शेड व खुर्च्या कुठे गेल्या, कुठे आहेत, याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत चालले आहे, याकडे आताच लक्ष दिले गेले नाही, तर वाढत्या उन्हात याठिकाणी एकही छत नसल्याने एखाद्या वयोवृद्ध इसमाचा तथा बालकाचा व एखाद्या विद्यार्थ्याचासुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच अड्याळ हे गाव चर्चेत राहत असतानासुद्धा याठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी एक साधा प्रवासी निवारा तयार करायला जर ग्रामवासी वर्गणी गोळा करून मदतीचा हात पुढे करतात, तर मग लोकप्रतिनिधी तथा लोकप्रिय नेते व राजकारणी मंडळी अशा वेळी जातात कुठे, असेही आज बोलले जात आहे.

महामार्गाचे बांधकाम सुरू आहे; पण ज्या-ज्याठिकाणी कामे झालीत त्या-त्याठिकाणी दिवसातून कितीदा पाण्याचा शिडकाव होतो. ग्रामवासी तथा प्रवाशांना रोजचा किती त्रास होतो, याची जराशी तरी जाणीव आहे का कुणाला, असाही सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.

Web Title: No place to sit, no roof over your head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.