पावसाचा पत्ता नाही, टंचाईची तीव्रता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:12 PM2019-06-12T22:12:23+5:302019-06-12T22:13:04+5:30
जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे. जिल्ह्यात कुठेही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही. मृग नक्षत्र लागून चार दिवस झाले आहे. अद्यापही मान्सूनच्या पावसाचे निश्चित नाही.
भंडारा भात उत्पादक जिल्हा आहे. भातासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १२ जून या कालावधीत सरासरी ७८.२ टक्के पाऊस कोसळतो. मात्र यंदा १२ दिवसात एक थेंबही पाऊस कोसळला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत सरासरी १०१.२ मिमी पाऊस झाला होता. पावसाचा थांगपत्ता नाही. दररोज तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. जिल्ह्यातील ६४९ गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता या गांवामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगेचे पात्रही कोरडे पडले आहे. नदीतिरावरील गावातील नळ योजना शेवटचा घटका मोजत आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या उपाययोजना अत्यल्प तोकड्या ठरल्या. जिल्हा टँकरमुक्त असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल झाले आहे. अनेक गावात खाजगी टँकरने पाणी आणावे लागत आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाई भीषण होण्याची चिन्हे आहेत. आता सर्वांना पावसाचे वेध लागले असून कधी एकदा धो-धो पाऊस बसरतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
पऱ्हे टाकणे खोळंबले
भात पिकासाठी मृग नक्षत्रात पाऊस झाला की शेतकरी आपल्या शेतात पºहे टाकतात. त्यानंतर पºहे मोठे झाले की त्याची रोवणी केली जाते. मात्र यंदा अद्यापही कुठेच पाऊस पडला नाही. त्यामुळे पऱ्हे टाकण्याचे काम खोळंबले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. त्यांनी पऱ्हे टाकले आहेत. मात्र प्रचंड तापमानामुळे पऱ्हे करपत असल्याचे दिसत आहे. आता सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
असह्य उकाडा
जिल्ह्यात तापमानाने यावर्षी उच्चांक गाठला. गत महिन्याभरापासून पारा ४५ अंशाचा वर आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. कुलर, पंखे आणि एसीही कुचकामी ठरत आहे. कुलरमधून गरम हवा येत आहे. घरात बसनेही असह्य झाले आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण तापलेले असते. त्यातच विजेचा पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे असह्य उकाड्याने जीव कासावीस होतो.