नो स्मार्टफोन, नो कव्हरेजने ई-पीक नोंदणी समस्येत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:13+5:302021-09-10T04:42:13+5:30
ग्रामीण भागात अजूनही इत्थंभूत इलेक्ट्रॉनिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अर्थव्यवस्था डबघाईस आली असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही. स्मार्टफोन नसल्याने ...
ग्रामीण भागात अजूनही इत्थंभूत इलेक्ट्रॉनिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अर्थव्यवस्था डबघाईस आली असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही. स्मार्टफोन नसल्याने त्याला हाताळण्याचे ज्ञान नाही. मोबाईलकरिता ग्रामीण भागात लिंक, कव्हरेज सुद्धा नाही. त्यामुळे शासनाच्या ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी समस्येत आली आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत त्यांनी वसुलीचा गोरखधंदा सुरू केलेला आहे.
कित्येक अल्पभूधारक शेतकरी शेती गावातील एखाद्याला वर्षभर पेरणीकरिता देतात. स्वतः कुटुंबासह मोलमजुरीसाठी शेकडो किलोमीटर दूर राहतात. कित्येक शेतकरी राज्याबाहेर कामाकरिता गेले आहेत. तेव्हा अशा परराज्यात किंवा परजिल्ह्यात गेलेल्या शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी शक्य आहे का? असा प्रश्न जिल्हा परिषद माजी सदस्य गोपीचंद भेंडारकर यांनी केला आहे.
कोट
शेतकऱ्यांकडे स्वतःचा स्मार्ट मोबाईल जरी नसेल तरी शेजारच्या स्मार्ट मोबाईलवरून नोंदणी करू शकता. एका मोबाईलवर २० शेतकरी नोंद करू शकतात. कव्हरेज नसल्यास थेट शेतातील पिकाचा फोटो घेऊन कव्हरेज आल्यानंतर अपलोड करता येऊ शकतो. काही समस्या असल्यास तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सुनील कासराळे, तलाठी, पालांदूर.
कोट
ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणीसाठी तलाठी स्तरावर सहकार्य मिळेल. शासनाने पुरविलेल्या आदेशाने काम सुरू आहे. येणाऱ्या अडचणीची माहिती घेऊन आणखी काही सकारात्मक करता येण्याजोगे असल्यास प्रयत्न सुरू आहेत.
बी. आर. मडावी,
नायब तहसीलदार, लाखनी.