एससी, एसटींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण नको; लाखांदुरात शांती मार्च धडकला तहसील कार्यालयावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:42 AM2024-08-22T11:42:33+5:302024-08-22T11:44:43+5:30
जिल्ह्यात तालुकास्थळी आंदोलन: आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला. हजारो नागरिकांचा शांती मार्च लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकला. लाखांदुरात भारत बंद व शांती मार्चचे आयोजन बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती व समता सैनिक दलाच्या वतीने करण्यात आले होते.
मोर्चानंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा अनिल काणेकर यांच्यासह रोशन फुले उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा जि. प.चे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, जि. प. सदस्य विशाखा माटे, लाखांदूर न.प.चे माजी गटनेते रामचंद्र राऊत, दीपक चिमणकर, प्रकाश रंगारी, आदिवासी समाजाचे नेते रूपचंद नाईक, समता सैनिक दलाचे तालुका प्रतिनिधी कुशल बोरकर, बहुजन समाज पार्टीचे प्रतिनिधी परमेश्वर पिल्लेवान, बहुजन एकता मंचचे प्रतिनिधी चंद्रहास चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी प्रभाकर मेश्राम, माना समाजाचे प्रतिनिधी नीलकंठ दडमल, गोपाल मेंढे, निरू मेश्राम, ज्योती रामटेके, अस्मिता लांडगे, दीक्षा बोदेले यासह अन्य उपस्थित होते.
या मार्चमध्ये तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी या मार्चला पाठिंबा दर्शवित तहसील कार्यालयावर धड़क मोर्चा काढला. दरम्यान, सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शांती मार्चच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार वैभव पवार व नायब तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले आहे.
या मार्चमध्ये आदिवासी समाज संघटना, तालुका समता सैनिक दल, बहुजन एकता मंच, वंचित बहुजन आघाडी, तालुका काँग्रेस कमिटी, माना समाज यांसह अन्य सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवत मार्चमध्ये सहभागी झाले.
मोहाडीत व्यवहार सुरळीत
मोहाडी येथे आज पुकारण्यात आलेल्या बंदला नगण्य प्रतिसाद मिळाला. सर्व दुकाने सकाळपासून सुरू होती. तसेच सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. तथागत बौद्ध विहार समिती मोहाडी तर्फे तहसीलदार मोहाडी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी राकेश मेंढे, गुलशन बागडे, संकेत मेश्राम, पूजा ढोले, वंदना मेश्राम, रवींद्र राऊत, निखिल गजभिये आदी उपस्थित होते