लसीकरण नाही, तर वेतनही मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 05:00 AM2021-11-19T05:00:00+5:302021-11-19T05:00:43+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, आजही अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी असला, तरी धोका मात्र टळलेला नाही. एकीकडे जिल्ह्यातील ५० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होऊन जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. असे असताना शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लसच घेतली नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन रोखण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, आजही अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊनही या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत उदासीनता दाखविली आहे. आता प्रशासनाने कडक धोरण अवलंबित अद्यापही पहिला डोस घेतला नाही आणि दुसरा डोस प्रलंबित असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काढू नये, असे निर्देश लेखी स्वरुपात जारी करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
यासोबतच जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या, कारखाने, खासगी आस्थापनात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०० टक्के लसीकरण करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अद्याप पहिलाही डोस घेतला नाही अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना आस्थापनात प्रवेश देऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेतील निर्णायक टप्पा पार पडला असून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेची मोठी उपलब्धी समजली जात आहे. जिल्ह्यातील ८ लाख ९८ हजार ४०० नागरिकांपैकी ८ लाख ३१ हजार ७७५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांची टक्केवारी ९२.५७ टक्के आहे. तर ४ लाख ५३ हजार ८५८ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ५०.५४ टक्के आहे. कोरोना विषाणूविरुद्ध लढाईत लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा असून जिल्ह्याने १८ नोव्हेंबरपर्यंत निर्णायक मोठा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील अर्धी अधिक लोकसंख्या लसीने संरक्षित झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गुरुवारी दिली. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून हे लक्ष साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूक्ष्म व योग्य नियोजनाने हा टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असला, तरी नागरिकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करावे. तसेच जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.
भंडारा जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर
- कोरोना लसीकरणात भंडारा जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. आता राज्यातील मुंबई, पुणे नंतर भंडारा जिल्ह्याने स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यात ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून लवकरच १०० टक्के लसीकरण केले जाणार आहे.
- लसीकरणासाठी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटांतील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ७८ टक्के, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४७ टक्के आहे. ४५ ते ५९ वयोगटांत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०३.९६, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ६० टक्के आणि ६० वर्षांवरील ११४ टक्के नागरिकांनी पहिला, तर ६१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला.