नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था भविष्यात ढासळणार
By Admin | Published: January 5, 2017 12:28 AM2017-01-05T00:28:01+5:302017-01-05T00:28:01+5:30
केंद्र सरकारने नोटाबंदीचा जनतेवर लादलेला निर्णय अन्यायकारक असून भविष्यात या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील, ...
गुडधे यांचा आरोप : केंद्राच्या निर्णयाविरूद्ध ७ रोजी मोर्चा
भंडारा : केंद्र सरकारने नोटाबंदीचा जनतेवर लादलेला निर्णय अन्यायकारक असून भविष्यात या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतील, असा आरोप करून केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करीत आहे. येत्या ७ जानेवारीला भंडारा येथे मोर्चा काढून या निर्णयाविरूद्ध निदर्शने करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रफुल्ल गुडधे पाटील, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
प्रधानमंत्र्यांचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगून गुडधे पाटील म्हणाले, ५०० व १००० रूपयांच्या नोटा अचानक बंद केल्यामुळे नागरिकांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागले. ५० दिवसांचा कालावधी संपूनही नागरिकांना दिलासा मिळाला नाही. ग्रामीण भागात अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून शेतकरी, शेतमजुरांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांच्या समस्यांवर निर्बंध घालण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी लागू केली. परंतु समस्यातून देशातील आर्थिक व्यवहार अद्याप रूळावर आला नाही. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करून ३१ डिसेंबर रोजी केलेल्या घोषणेतही सामान्यांना दिलासा मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. नगर परिषद निवडणुकीत भाजपचा जनाधार कमी झाला असला तरी या मुद्यांचा राजकीय लाभ काँग्रेसला घेता आला नाही. याची कारणमीमांसा करण्यात येत असून लवकरच संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार असल्याचा सूचक ईशारा त्यांनी दिला.जिल्हा प्रभारी मुजीब पठाण म्हणाले, सरकारने नोटबंदीच्या निर्णयानंतर ६३ अध्यादेश काढले. त्यावरून सरकारचा नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता, असे सिद्ध होते. नोटबंदीनंतर सरकारने जितका काळा पैसा जमा केला, त्यापेक्षा एका स्मारकावर खर्च करीत आहेत. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर म्हणाले, नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर जिल्हा बँकांच्या स्थितीत सुधारणा आलेली नाही. पत्रपरिषदेला कार्याध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, मार्कंड भेंडारकर, अजय गडकरी, महेंद्र निंबार्ते, भूषण टेंभुर्णे, अनिक जमा पटेल व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)