साकोलीत स्थगितीनंतरही नामांकन दाखल
By admin | Published: October 9, 2015 01:10 AM2015-10-09T01:10:43+5:302015-10-09T01:10:43+5:30
राज्यपालांच्या अध्यादेशानंतर शासनाने जाहीर केलेल्या साकोली नगर पंचायत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात यावी ...
मोर्चेबांधणीला पूर्णविराम : उमेदवारांची अनामत रक्कम केव्हा परत मिळणार?
संजय साठवणे साकोली
राज्यपालांच्या अध्यादेशानंतर शासनाने जाहीर केलेल्या साकोली नगर पंचायत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात यावी यासाठी माजी सभापती मदन रामटेके यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. यावर उच्च न्यायालयाने या निवडणुकीला अंतरीम स्थगिती दिली. असे असतानाही आज नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी साकोलीत २५ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. उच्च न्यायालयाच्या पत्रानंतर दुपारी १ वाजता ही प्रक्रिया थांबविण्यात आली.
राज्यपाल विद्यासागर राव यांनी साकोली नगर पंचायतीची अधिसूचना रद्द करून दि. ३ सप्टेंबर रोजी नगर परिषदेची घोषणा केली होती. मात्र आक्षेप घेण्याच्या ३० दिवसांचा कालावधी संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने साकोली नगर पंचायतची निवडणूक जाहीर केली. त्यानंतर माजी सभापती मदन रामटेके यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. तरीही साकोली येथे दुपारी १ वाजेपर्यंत २५ नामांकन अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली, अशी सूचना फलकावर लावण्या आली. मात्र या सूचनेवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची सही नसल्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी आलेले उमेदवार संभ्रमात पडले होते.