नामांकन आजपासून; सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:22+5:30
भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापायला सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी आता नामांकनाला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. नगरपंचायतीच्या नामांकनासाठी १ ते ७ डिसेंबर आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १ ते ६ डिसेंबर हा अवधी आहे.
ज्ञानेश्वर मुंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकनाला बुधवार, १ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकत्रित असलेले तीनही पक्ष स्वबळाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भाजपनेही सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवाराचे पत्ते उघड केले नसले तरी सर्वच जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीची निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापायला सुरू झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी आता नामांकनाला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. नगरपंचायतीच्या नामांकनासाठी १ ते ७ डिसेंबर आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १ ते ६ डिसेंबर हा अवधी आहे. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत उमेदवार निश्चित करणे गरजेचे झाले आहे. गतवेळी भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी तयार झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना राज्याच्या सत्तेत एकत्र आले. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत हे तीनही पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींनी निर्णय दिला तर आम्ही आघाडी करण्यास तयार आहोत, असे स्थानिक नेते सांगत आहेत. सध्या या तीनही पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागा लढण्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे या तीनही पक्षांचा सध्यातरी स्वबळाच्या दिशेने प्रवास सुरू आहे.
राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही या निवडणुकीत ताकतीने उतरण्याचे ठरविले आहे. उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात आली असून, कार्यकर्त्याचे मनोगत ऐकून घेतल्यानंतर बैठकीत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील, असे सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्वाची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीने आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीवर डोळा ठेवून नेतेही कामाला लागले आहेत.
उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करून अंतिम निवडही केली आहे. परंतु बंडखोरी टाळण्यासाठी नामांकन दाखल करण्याच्या एक दिवस आधी उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. सध्यातरी एकला चलो रे अशी भूमिका आहे. उमेदवारांची चाचपणी झाली असून, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत.
-नाना पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
शिवसेना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत संपूर्ण ताकतीने स्वबळावर उतणार आहोत. त्यादृष्टीने तयारी झाली आहे. आम्ही शिवसैनिक आहोत. परंतु आदेश आला तर त्याप्रमाणे काम करू. उमेदवार निवडीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. परंतु वरिष्ठ जो आदेश देतील तो आम्हाला मान्य आहे.
- संजय रेहपाडे, अनिल गायधने, जिल्हाप्रमुख, शिवसेना
काँग्रेसने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. जवळपास उमेदवार निश्चित झाले आहेत. आम्ही १०० टक्के जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. ५२ गट आणि १०४ गणात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. आघाडीबद्दल वरिष्ठांचा आदेश आम्हाला मान्य असेल.आम्ही सर्वच जागांवर लढण्याची तयारी केली आहे.
-मोहन पंचभाई, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
भाजपने इच्छुकांची चाचपणी केली असून, कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले जात आहे. वरिष्ठांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत उमेदवारांच्या नावाची घोषणा होईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपूर्ण जागांसोबतच नगरपंचायतही आम्ही लढणार आहोत. भाजपने निवडणुकीची पुर्ण तयारी केली आहे.
-शिवराम गिऱ्हेपुंजे, जिल्हाध्यक्ष, भाजप
प्रचारासाठी मोजकेच दिवस
- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांना मोजकेच दिवस मिळणार आहेत. तीनही निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी १३ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. चिन्हांचे वाटप होऊन त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होईल. परंतु उमेदवारांना अगदी मोजकेच दिवस मिळत असल्याने सर्वांपर्यंत पोहचणे अशक्य होणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासूनच प्रचाराचे योग्य नियोजन करताना दिसत आहे.