नियमबाह्य भाजीपाला मार्केटला अभय
By admin | Published: October 8, 2016 12:34 AM2016-10-08T00:34:22+5:302016-10-08T00:34:22+5:30
नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: शिवसेना आंदोलनाचा इशारा
भंडारा : नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यावर योग्य तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्यता येईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी दिला आहे.
भंडारा शहरातील जलशुध्दीकरण केंद्राजवळील १.५० एकर जागेवर नियमबाहयरित्या, अवैधपणे ठोक भाजी मार्केटचे बांधकाम जेमतेम सुरु झाले असतांनी शिवसेनातर्फे सर्वप्रथम याला विरोध केला. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सदर कामावर स्थगिती दिलेली होती. या स्थगिती दरम्यान बांधकाम पुर्णपणे बंद करावयाची जवाबदारी नगर पालिका प्रशासनाची होती. परंतु जवाबदारीचे भान न ठेवता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळयादेखील भाजी मार्केटचे काम पुर्ण होवून भाजी मार्केट सुरु देखील झाले. तेव्हापासून अनेकदा या विषयांवर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, मुख्यमंत्र्यापर्यंत शिवसेनातर्फे निवेदने देण्यात आलीत.
वास्तविक ही जागा चार वर्षापुर्वी मंजुर झालेल्या परंतु त्यासाठी अद्यापही जिल्हा प्रशासनाला जागा न मिळू शकणाऱ्या स्वतंत्र्य महिला रुग्णालयासाठी शिवसेनातर्फे मागण्यात आलेली होती. परंतु विषयाचे गांर्भीर्य न कळलेल्या लोप्रतिनिधीनी भाजी मार्केटला ही जागा द्यावी, याकरिता प्रयत्न केले, हे या दुर्देव म्हणावे लागेल.
शिवसेनेतर्फे एक वर्षापासून या विषयावर प्रशासनाशी, शासनाशी भांडून स्वाक्षरी मोहीम राबवून ११ हजार सहयानिशी मुख्यमंत्र्यांना निवेदन अशा अनेक प्रकारे हा विषय तेवतच ठेवला. परंतु राजकीय नेत्यांच्या आर्शीवादाने ठोक भाजी मार्केट सुरु झाला, त्यातही नियमांना धाब्यावरच बसविण्यात आले, बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नगर पालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र न घेता, इतर ठोक भाजी व्यापाऱ्यांचा नगर पालिकेशी करारपत्र न होताच अनिधिकृतपणे भाजी मार्केट सुरु झाले. अधिकारी मात्र तोंड पाहतच असल्याने त्यांच्यावर संशय येत असल्याचेही रेहपाडे यांनी म्हटले आहे.
नगर पालिका प्रशासनाने ज्या बीटीबी संस्थेशी करारनामा करुन ही जागा ठोक भाजी मार्केटला दिली. मागील वर्षभरापासून चालणाऱ्या या सर्व गैरप्रकाराला पुर्ण विराम देवून ठोक भाजी मार्केटच्या नावाने अवैधरित्या, नियमाबाहयरितीने उभे केलेले बांधकामाची जागा ही जिल्हयातील एकमेव होणाऱ्या महिला रुग्णालयासाठी देवून जिल्हयातील महिला रुग्णांना न्याय देण्यात यावा. प्रशासनाने वेळीच या मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनातर्फे १५ आॅक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा येणार आहे तो मोर्चा भाजी मार्केटकडे वळता करु अशा इशाराही प्रशासनास दिला आहे.
त्या दरम्यान काही परिस्थिती उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल यांची नोंद घ्यावी, असा इशारा शिवसेना तर्फे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, अनिल गायधने, ललित बोंद्रे, नितीन साकुरे, सतिश तुरकर, न.प.सदस्य किरण व्यवहारे, मयुर लांजेवार, पंकज दहीकर, संदिप सार्वे, रोशन कळंबे, सुधीर उरकुडे, जग्गु हजारे, नितेश मोगरे, आशीष महाकाळकर, आकाश जनबंधु, प्रविण कळंबे, प्रकाश देशकर, मयुर जोशी आदींनी केली आहे.(नगर प्रतिनिधी)