मोहाडी तालुक्यातील तीन गावांत एकानेही घेतली नाही लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:27+5:302021-06-21T04:23:27+5:30

कसे होणार लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण? सिराज शेख मोहाडी : कोरोनाला थोपविण्यासाठी सध्या तरी लसीकरण हा एकमेव उपाय असला तरी ...

None of the three villages in Mohadi taluka has been vaccinated | मोहाडी तालुक्यातील तीन गावांत एकानेही घेतली नाही लस

मोहाडी तालुक्यातील तीन गावांत एकानेही घेतली नाही लस

Next

कसे होणार लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण?

सिराज शेख

मोहाडी : कोरोनाला थोपविण्यासाठी सध्या तरी लसीकरण हा एकमेव उपाय असला तरी ग्रामीण भागातील अनेक गावांत लस घेण्याबाबत अनेक नागरिकांच्या मनात शंका आहेत. मोहाडी तालुक्यातील सीतेपार, लेंडझरी, बिटेखारी या गावांत एकाही व्यक्तीने लस घेतलेली नाही; तर अनेक गावांत फक्त दोन-चार व्यक्तींनीच लस घेतली असल्याचे सरकारी अहवालानुसार कळते.

अनेक गावांत फक्त दोन-चार व्यक्तींनीच लस घेतली आहे. दुसरीकडे, नरसिंहटोला या गावातील ४५ वर्षांपेक्षा अधिक असलेल्या ८४७ व्यक्तींपैकी ५६० लोकांनी लसीकरण करून एक आदर्श स्थापित केला आहे. यावर्षी ग्रामीण भागात कोरोनाने चांगलाच कहर केला. प्रत्येकच गावात कोरोनाने एकजण तरी दगावला आहे. नेमकी याच वेळी लसीकरण मोहीम सुरू होती. ‘लस घेतल्यानंतर साधारणतः ताप येतो. पॅरॅसिटीमॉलची गोळी घेतल्यावरही काहींचा ताप कमी झाला नाही व नंतर त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला,’ अशी अफवा ग्रामीण भागात पसरल्याने ग्रामीण लोकांनी लस घेण्यास नकार दिला. याचा फटका लसीकरण मोहिमेला बसत आहे.

यावेळी मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी लसीकरण मोहिमेच्या दोन दिवसांपूर्वी १८ व १९ जूनला जनजागृतीसुद्धा करण्याचे आदेश दिले होते. यासाठी शिक्षक, ग्रामसेवक, सरपंच, आशा सेविका, पोलीस पाटील, तलाठी यांना जबाबदारी देण्यात आली होती. यांपैकी कोणी किती जबाबदारीने जनजागृती केली, लोकांच्या मनात असलेली चुकीची धारणा काढून लसीकरणाचे फायदे समजावून सांगण्यात किती यश आले, हे लसीकरणाच्या आकड्यांवरून स्पष्ट होईलच. महाराष्ट्र शासन कितीही दावे करो; ते यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा शासकीय कर्मचारी इमानदारीने व इच्छाशक्तीने कार्य करतील. नाही तर एक-दोन ठिकाणी जायचे, फोटोसेशन करायचे व आम्ही आपले कर्तव्य पार पाडले हे वरिष्ठांना दाखवायचे, ही प्रवृत्ती त्यांना सोडावी लागेल, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

Web Title: None of the three villages in Mohadi taluka has been vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.