राष्ट्रीय महामार्ग नव्हे मृत्यूचा महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:42 AM2021-09-17T04:42:14+5:302021-09-17T04:42:14+5:30

भंडारा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. देशातील प्रमुख महामार्गात त्याची गणना होते. अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. डांबरी असलेल्या ...

Not a national highway, but a highway of death | राष्ट्रीय महामार्ग नव्हे मृत्यूचा महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग नव्हे मृत्यूचा महामार्ग

Next

भंडारा जिल्ह्यातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. देशातील प्रमुख महामार्गात त्याची गणना होते. अहोरात्र वाहनांची वर्दळ असते. डांबरी असलेल्या या महामार्गावर पावसाळ्याच्या दिवसात मोठाले खड्डे पडले आहेत. एक किलोमीटर अंतरातील खड्डे मोजतानाही कुणाचीही दमछाक होईल, अशी अवस्था या महामार्गाची झाली आहे. साकोली तालुक्यातील जांभळी ते मुंडीपार हा रस्ता तर आणखीनच भयावह झाला आहे. वनकायद्यामुळे या परिसरात रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले नाही. दुहेरी मार्ग असलेल्या या परिसरात आता मोठाले खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर अक्षरक्ष: एक एक फुटाचे आहेत.

या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेवून जावे लागते. दुचाकी चालकांच्या तर रस्ता पार करताना अंगावर काटे येतात. असा एकही दिवस जात नाही की या महामार्गावर अपघात झाला नाही. बुधवारी प्रा. प्रोफेसर बहेकार आपल्या दुचाकीने साकोलीकडे येत होते. त्यावेळी एका खड्ड्यातून दुचाकी उसळली आणि खाली कोसळली. त्याचवेळी त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. त्यांचा हकनाक खड्ड्याने बळी घेतला. गत तीन वर्षांत आठ जणांना या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. परंतु पावसामुळे पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होते.

बॉक्स

वनकायद्यात अडकला महामार्ग

राष्ट्रीय महामार्गाचे आठ वर्षांपूर्वी भंडारा ते साकोली असे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र जांभळी ते मुंडीपार या परिसरात रस्ता तयार करण्यास वनविभागाने परवानगी दिली नाही. वनकायद्यामुळे हा तीन किलोमीटरचा रस्ता दुपदरी आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट जंगल असून, रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या रस्त्याची दुरुस्ती सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. परंतु पावसाळ्यात या रस्त्याची पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती झाली आहे.

बॉक्स

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने पुढाकार घेतला नाही. रस्त्यावरून नेहमी आपल्या आलिशान वाहनातून आमदार, खासदार जात असतात. परंतु त्यांना या रस्त्यावरील खड्डे दिसत नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

बॉक्स

महामार्ग प्राधीकरणाला माहिती

नागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी असलेल्या पोलिसांनी आता सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पत्र पाठविले आहे. तात्काळ रस्ता दुरुस्तीची सूचना केली आहे. तर साकोली के सितारे या ग्रुपने सकाळपासून संबंधित विभागाला माहिती देऊन रस्ता दुरुस्तीची माहिती दिली. तसेच प्रा. बहेकार यांना आर्थिक मदत देण्यासाठी निवेदन देण्यासाठी तयारी चालविली आहे.

Web Title: Not a national highway, but a highway of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.