मोबाईल बालपणच नव्हे तर दृष्टीही हिरावतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:44 PM2019-08-28T23:44:35+5:302019-08-28T23:46:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ज्येष्ठांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने विविध समस्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ज्येष्ठांपासून चिमुकल्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचा लळा लागला आहे. अहोरात्र मोबाईलमध्ये मान घालून बसल्याने विविध समस्या निर्माण होत आहेत. सर्वाधिक समस्या बालकांमध्ये दिसत असून मोबाईल बालपणच नव्हे तर दृष्टीही हिरावत आहे. भंडारा येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.विशाखा जिभकाटे यांनी २५२ मुलांच्या मोबाईल सवयीचे सर्वेक्षण केले. त्यात अनेक धक्कादायक निष्कर्ष पुढे आले आहेत.
सध्या घरोघरी टिव्ही, मोबाईल, संगणक दैनंदिन कामासाठी वापरल्या जातो. नवीन पिढी तर टेक्नोसॅव्ही झाली आहे. प्रत्येकाच्या घरी किमान दोन तरी स्मार्ट फोन आहेतच. सुरुवातीला कुतूहल म्हणून मुलांच्या हातात दिलेला मोबाईल आता सवयीचा झाला आहे. मात्र त्याच्या गंभीर समस्यांचाही सामना करावा लागत आहे. डॉ.विशाखा जिभकाटे यांच्याकडे येणारे बहुतांश पालक मोबाईलमुळे आपल्या मुलाची दृष्टी कमी झाल्याची तक्रार घेऊन येतात. १०० पालकांमध्ये २५ ते ३० पालक अशी समस्या घेऊन तपासणीसाठी आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. भंडारा शहरातील २५२ पालकांच्या माध्यमातून मुलांच्या मोबाईल सवयीचा अभ्यास केला. एक प्रश्नावली पालकांना देण्यात आली. त्यात मुलं किती वेळ अभ्यास करतात, कितीवेळ टिव्ही बघतात, कितीवेळ मोबाईलवर खेळतात आणि कितीवेळ बाहेर खेळायला जातात असे काही प्रश्न होते. त्यात अनेक धक्कादायक निष्कर्ष पुढे आले. लहान मुलांच्या हातातून मोबाईल काढणे अगदी दिव्य असल्याचे या पालकांनी कबुल केले. बालकांपुढे पालकांचे काहीही चालत नाही.
मोबाईलने वाढला चष्म्याचा नंबर
-सर्वेक्षणात उच्च, मध्यम आणि कनिष्ठ गटातील पालकांकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. त्यात उच्च-मध्यमवर्गीयांच्या मुलांमध्ये दूरचे दिसत नसल्याच्या अनेक तक्रारी आढळून आल्या. अनेक मुलांना चष्म्याचा नंबर वाढल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील पालकांमध्ये या तक्रारी दिसल्या नाहीत. त्यांच्या मुलांना चष्माही अगदी कमी लागल्याचे दिसून येते.
पब्जीचे जडले व्यसन
मोबाईलवर पब्जीमुळे अनेक मुले वेडेपिसे झाल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. रात्री झोपेतही मुले दचकून उठतात. दिवसभर मोबाईलमध्ये मान टाकून बसलेले असतात. आपल्या पाच-सहा मित्रांचा ग्रूप तयार करून मोबाईलवर खेळत असतात. पब्जी खेळणाऱ्यांमध्ये दहावीनंतरचे असल्याचे या सर्वेक्षणात पुढे आले.
मुलांना वेळ देणे गरजेचे
लहान मुलं ही चंचल असतात. त्यांच्या मेंदूला काहीतरी हवे असते. बहुतांश पालक मुलांच्या हाती मोबाईल देऊन आपली सुटका करून घेतात. मात्र त्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. पालकांनी मुलांना विविध अॅक्टीव्हीटीमध्ये गुंतवावे. मैदानी खेळासाठी प्रवृत्त करावे. एवढेच नाही तर पालकांनीही आपल्या मोबाईलच्या सवयी बदलायला हव्या. घरात सारखे मोबाईलवर न राहता मुलांसोबत संवाद साधत त्यांना वेळ देण्याची गरज आहे, असे डॉ.विशाखा जिभकाटे यांनी सांगितले.