रस्ता नव्हे, हा तर मृत्यूमार्ग
By admin | Published: November 4, 2016 12:54 AM2016-11-04T00:54:03+5:302016-11-04T00:54:03+5:30
अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही.
भंडारा : अत्यंत रहदारीचा रस्ता असूनही मागील दोन दशकांपासून रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. वर्तमानस्थितीत रस्त्याहून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण नव्हे तर चक्क मृत्युला निमंत्रण देण्यासारखे आहे. असे असतानाही नगरपालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा गर्भित इशाराही येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे. यापूर्वीही या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना देण्यात आले होते. मात्र ‘पळसाला पाने तीनच’ या युक्तीप्रमाणे या निवदेनालाही केराची टोपली दाखविण्यात आली. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील हनुमान नगर ते दिवाण सभागृहापर्यंतचा रस्ता ठिकठिकाणाहून उखडलेला आहे. मागील २० वर्षांपासून या रस्त्याची अवस्था जैसे थे अशीच आहे.
या रस्त्याहून हनुमान नगर, आनंद नगर, समृद्धीनगर, अष्टविनायक नगर, आॅफीसर कॉलनी, म्हाडा कॉलनी, अंबिका नगर तसेच खात रोड परिसरातील नागरिक रहदारी करीत असतात. शहरातील मुख्य मार्गाला जोडणारा रस्ता म्हणूनही याची ओळख आहे. भरगच्च वस्ती असलेल्या प्रभागातील नागरिक या रस्त्याने रहदारी करीत असले तरी नगरपालिका प्रशासन रस्त्याच्या बांधकामाकडे का दुर्लक्ष करीत आहेत हे एक न सुटणारे कोडे आहे. ठिकठिकाणाहून गिट्टी उखडलेली असल्याने दुचाकीस्वार अनेकवेळा स्लीप झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या उग्र रुप धारण करीत असते.
मागील दोन दशकांपासून ही समस्या असताना नगरपालिका प्रशासनाने निवेदनाच्या माध्यमातून अनेकदा कळविण्यात आले. प्रभागातील नगरसेवकांचे आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे या रस्त्याची समस्या ही कायम आहे. या मार्गाहून जवळपास २ हजार नागरिक रहदारी करीत असल्याचे कळते. विशेष करून महिलांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो. प्रभागातील चारही नगरसेवकांना या समस्येबाबत कळविण्यात आले. कुणीही या रस्त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत.
परिसरातील नागरिकांकरिता शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, बसस्थानक, बाजार अशा मूलभूत स्थळी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. परंतु रस्त्याची दूरवस्था झाल्याने जीव धोक्यात घालून रहदारी करावी लागत आहे. सदर रस्त्याचे त्वरीत बांधकाम करून परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे अशी आर्त हाक येथील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष दिल्यास ही समस्या मार्गी लागू शकते. (प्रतिनिधी)