राज्यमार्ग नव्हे हे तर मृत्यूचे प्रवेशद्वारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 05:00 AM2020-09-11T05:00:00+5:302020-09-11T05:00:06+5:30
जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात.
संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराला रेल्वे मार्गाने जोडणारा १५ किलोमीटरचा भंडारा ते वरठी रस्ता ठिकठिकाणी उखडला असून राज्य मार्ग नव्हे तर मृत्यूचे प्रवेशद्वार म्हणावे इतपत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरून जाणारा प्रत्येक जण वरठी मार्गावर प्रवास नको रे बाबा असे म्हणत आहे.
जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यातच अतिवृष्टी आणि महापुरानंतर अनेक रस्ते वाहून गेले. त्याचा फटका भंडारा ते वरठी या राज्य मार्गाला बसला आहे. वरठी येथे रेल्वे स्टेशन असून दररोज शेकडो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तसेच मध्यप्रदेशकडे जाणाराही हाच प्रमुख मार्ग आहे. परंतु अलिकडे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून धुळीचे लोट उडतात. वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर उखडलेल्या खड्ड्यातील दगड चाकांमधून उसळून दुसऱ्या वाहनचालकांना लागण्याच्या घटना घडत आहेत. लहान सहान अपघात तर नित्याचीच बाब आहे. गत आठवड्यात एका तरुणाला नाहक जीव या खड्ड्यांमुळे गमवावा लागला होता. रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.
या मार्गावरून शेकडो चारचाकी, दुचाकी वाहने धावतात. रस्ता उखडलेला असला तरी रेतीचे ट्रक आणि ट्रॅक्टरही भरधाव धावताना दिसून येतात. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गत काही महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकाच्या अंगावर काटा उभा राहत असून अनेकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले आहेत.
महामार्गावर अनधिकृत पार्कींग
राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी फाटा आणि ठाणा, खरबी नाका या ठिकाणी वाहनांची अनधिकृत पार्कींग केली जाते. ट्रकच्या लांबच लांब रांगा येथे लागलेल्या असतात. आधीच अरुंद असलेल्या या मार्गावर खड्डेही पडले आहेत. त्यातच वाहने उभे राहत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. खरेदीदार रस्त्यावरच वाहन उभे करून खरेदी करतात. त्यामुळे अनेकदा येथे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक पोलीस शिपाई उपस्थित राहत असले तरी या वाहनचालकांवर मात्र कोणतीच कारवाई केली जात नाही.