६३ स्कूल बसेस मालकांना परवाना निलंबनाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:38 AM2017-07-21T00:38:47+5:302017-07-21T00:38:47+5:30
शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करण्यात यावी,
१८५ नोंदणीकृत बसेस : १२२ बसेसची फेरतपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या स्कूल बसेसची शाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करण्यात यावी, असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार भंडारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने १८५ नोंदणीकृत स्कूल बसेसपैकी १२२ बसेसेची फेरतपासणी केली आहे. अन्य ६३ बसेसच्या शाळांना परवाना निलंबनाची नोटीस बजावली आहे.
यावर्षीच्या सत्रात जिल्ह्यात १८५ नोंदणीकृत वाहनांमधून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम लक्षात घेऊन या बसेसची दरवर्षी तपासणी करण्यात यावी, जेणेकरून या बसेसमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे. हे काम उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. असे असताना ६३ स्कूल बसेस बाळगणाऱ्या शाळांनी बसेसची तपासणी केली नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
जिल्ह्यात १८५ स्कूल बसेस आहेत. त्या सर्व बस मालकांना किंवा शाळांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने फेरतपासणी करण्याचे नोटीस बजावले आहे.
त्यानुसार वाहनांची फेरतपासणी करणे गरजेचे होते. परंतु ६३ स्कूल बसेस मालकांनी तपासणी केलेली नाही. या बसेस मालकांनी वाहनांची तपासणी केली नाही तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येईल, असेही उपप्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले आहे.