डाळीनंतर आता लसूणही महागले
By admin | Published: November 29, 2015 01:34 AM2015-11-29T01:34:31+5:302015-11-29T01:34:31+5:30
आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त तसेच मसाला पदार्थांत उपयोगी ठरणारे लसूण आता तूर डाळीपेक्षा अधिक महागले आहे.
१८० रुपयांवर पोहोचला भाव : साठेबाजी होत असल्याचा अंदाज
भंडारा : आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त तसेच मसाला पदार्थांत उपयोगी ठरणारे लसूण आता तूर डाळीपेक्षा अधिक महागले आहे. २०० रुपये प्रतिकिलो लसूण विक्री होत असून सामान्यांना खरेदी करणे आवाक्याबाहेरचे झाले आहे. लसुणाची साठेबाजी होत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी बाजारपेठेत १०० ते १२० रूपये किलो दराने विक्री होत असलेल्या लसुणाचे दर १८० ते २०० रूपयांवर पोहोचले कसे, असा प्रश्न ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे. मात्र येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लसुणाची आवक कमी झाल्याचे सांगून भाव वाढल्याचे ग्राहकांना पटवून दिले जात आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांकडील लसूण विक्रीसाठी आला की, मातीमोल दरात खरेदी करण्याची साखळी दलालांकडून रचली जाते. परंतु त्यानंतर पाच ते सहा महिने उलटले की लसणाचे भाव गगनाला भिडतात. या सर्व घडामोडींत मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते.
अलीकडेच तूर डाळ महागाईने देशात राजकारण ढवळून निघाले असताना आता लसूण १८० रुपये दराने पोहचल्याने यात भर पडली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर महागल्याने गरीब, सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. भाजीबाजारात लसूण १६० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे बघून सामान्य ग्राहकांना ते खरेदी करताना जरा विचार करावा लागत आहे.
लसूण अचानक दुप्पट दराने विकले जात असल्यामागे साठेबाजी हेच मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.
लसूण विक्री करणारे ठरावीक थोक व्यापारी आहेत. याच व्यापाऱ्यांनी लसणाची साठेबाजी करून बाजार समितीत लसूण येण्यापासून रोखल्याची कुणकुण घाऊक भाजीपाला विक्रेत्यांची आहे. दीड ते दोन महिन्यांतच लसणाचे भाव दुप्पट झाले कसे? भाव नियंत्रणाची जबाबदारी कुणाची,? व्यापाऱ्यांचे गोदाम तपासणार कोण, असे प्रश्न अनुत्तरित आहे. अचानक लसणाने उचल खाल्ल्यामुळे सामान्यांच्या जेवणातून लसूण गायब होणार तर नाही, अशी शक्यता बळावली आहे.
लसूण उत्पादनाचा कालावधी सध्या संपुष्टात आला आहे, तर शेतकऱ्यांकडे हल्ली लसूण नाही, हीच अडचण हेरून व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरू केल्याचा सूर उमटू लागला आहे. निम्न दर्जाचे लसूण १६० रुपये तर चांगल्या दजार्साठी २२० रुपये प्रतिकिलो मोजावे लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास साठेबाजी करणारे व्यापारी गब्बर होणार असून सामान्य ग्राहकांची मात्र अडचण होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
महिनाभरात अचानक लसुणाचे दर वधारल्याने ते विकताना कसरत होत आहे. निम्न दर्जाचे लसूण २०० रुपये किलो विकले जात आहे. पुन्हा लसुणाचे भाव वाढतील, असा अंदाज आहे.
- प्रशांत गोस्वामी, विक्रेते खरबी नाका
लसूण २०० रुपये किलोवर पोहोचला, हे ऐकूनच ते खरेदी करताना क्षणभर विचार करावा लागतो. जीवनावश्यक वस्तुंचे दर नियंत्रण करणारी यंत्रणा कुचकामी ठरत असून ते व्यापाऱ्यांच्या पत्थ्यावर पडत आहे.
- अश्विनी बुरडे, गृहिणी भंडारा