आता सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार ‘गणवेश’

By admin | Published: March 20, 2016 12:30 AM2016-03-20T00:30:51+5:302016-03-20T00:30:51+5:30

सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते.

Now all students will get 'Uniform' | आता सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार ‘गणवेश’

आता सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार ‘गणवेश’

Next

प्रशांत देसाई भंडारा
सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यादृष्टिने सर्व शिक्षा अभियानने केंद्राकडे २ कोटी ७५ लाख ३० हजार रूपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. याची अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील ६८ हजार ८२६ विद्यार्थ्यांना गणवेशचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांनाच गणवेशाचा लाभ दिला जातो. मात्र, यावर्षी सर्व शिक्षा अभियानाच्या वरिष्ठांच्या निर्देशानुसार अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून जिल्ह्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेतील सर्व प्रवर्गातील मुली व मुलांना गणवेश वाटपाच्या दृष्टिने उपाययोजना करण्यात येत आहेत.
भंडारा जिल्ह्यात ८२४ शासकीय शाळा आहेत. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांचा समावेश आहे. जिल्हा परिषदच्या ७८९ तर नगरपालिकेच्या २६ शाळांचा यात समावेश आहे. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकासोबतच गणवेश वाटपाचे नियोजन सर्व शिक्षा अभियानने केले आहे. यासाठी सर्व शिक्षा अभियानने राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे २ कोटी ७५ लाख ३० हजारांच्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले आहे.
मागील वर्षीपर्यंत राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व प्रवर्गाती मुली व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांना गणवेश वाटप योजनेचा लाभ देण्यात आला.
यात जिल्ह्यातील ६६,०४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्व प्रवर्गातील ३६ हजार ८४८ मुलींसह अनुसूचित जाती ५,२४८, अनुसूचित जमाती २,८२२ व दारिद्र्य रेषेखालील २१,१२६ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
गणवेशासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थी ४०० रूपयांचा निधी दिला जातो. शासनाकडून निधी प्राप्त होताच सर्व शिक्षा अभियानातर्फे तो शाळांना वितरित केला जातो.
निधी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापका यांच्या संयुक्त खात्यावर जमा केला जातो. शालेय मोफत गणवेश वाटप योजनेंतर्गत सर्वाधिक विद्यार्थी संख्येत तुमसर तालुका प्रथम, मोहाडी तालुका द्वितीय तर भंडारा तालुका तिसऱ्या स्थानावर आहे.

जिल्हा परिषद व पालिकेतील सर्व प्रवर्गातील मुलांना आगामी शैक्षणिक वर्षात गणवेशाचा लाभ मिळावा, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय अंदाजपत्रक मुल्यमापन समितीने दिलेल्या निर्देशानुसार सर्व विद्यार्थ्यांसाठी गणवेश उपलब्ध व्हावा, यादृष्टिने अंदाजपत्रक सादर केला आहे.
- विरेंद्र गौतम,
सहायक कार्यक्रम अधिकारी, सर्व शिक्षा अभियान, भंडारा
सर्वसमावेशित शिक्षण प्रणालीनुसार केवळ काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप होवून भेदभाव होत होता. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जाती-भेदाचे बीज रूजत होते. सर्वांना गणवेश मिळाल्यास सर्वधर्म समावेशक शिक्षणामुळे विद्यार्थी घडतील.
- मुबारक सय्यद,
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.

Web Title: Now all students will get 'Uniform'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.