आता ‘बेला’ जिल्हा परिषद शाळा ‘कात’ टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:15 PM2017-09-08T23:15:02+5:302017-09-08T23:15:32+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने अनेक शाळा बंद अवस्थेत आहेत.
प्रशांत देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याने अनेक शाळा बंद अवस्थेत आहेत. अशात भंडारा तालुक्यातील बेला येथील शाळेने जिल्हा परिषद शाळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या शाळेत सुमारे ४०० विद्यार्थी आजमितीस शिक्षण घेत आहेत. यात प्री-प्रायमरी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ही संख्या तब्बल दिडशेच्या घरात असल्याने ही शाळा आता शिक्षणाची परिभाषाच बदलवित असून या शाळेला आयएसओ नामांकन मिळाले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या रोडावत चालल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. अशात भंडारा तालुक्यातील बेला येथील जिल्हा परिषदेची शाळा मात्र याला अपवाद ठरली आहे. या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसागणीक वाढत असून शालेय व्यवस्थापनाला पुढील वर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा? असा प्रश्न यावर्षी सतावत आहे.
राष्टÑीय महामार्गालगत असलेल्या बेला येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने आता विद्यार्थी संख्या मिळत नाही, ही परिभाषाच बदलवून टाकली आहे. या शाळेतील शिक्षक व शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शाळेने ‘कात’ टाकली आहे. कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना मिळणारे अत्याधुनिक शिक्षण या शाळेत दिल्या जात आहे.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासह शाळा व्यवस्थापन समितीने ‘प्री-प्रायमरी’ शाळा सुरु केली आहे. या शाळेत चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ही बाब जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत आश्चर्याची आहे.
एकीकडे विद्यार्थी मिळत नसल्याने जिल्हा परिषद शाळांवर अवकळा आलेली असताना बेला येथील शाळेने सर्वांसमोर हा नवा पायंडा घातल्याने सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शाळेतील मुख्याध्यापिका सरिता निमजे, एल. एस. निचत, के. एस. पाटील, आर. एस. वाडीभस्मे, यु. डी. टिचकुले, आर. डी. रहिले, ए. डी. शहारे, एस. एच. उपरीकर, एस.पी. बोरकर हे शिक्षक विद्यार्थी घडवित आहेत.
शाळेतील सुविधा व विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षणाचे धडे याची दखल घेवून शाळेला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी बेला जिल्हा परिषद शाळा आता ३६५ ही दिवस सुरु ठेवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शिक्षक व शिक्षण समितीने घेतलेला आहे.
लोकसहभागातून सहकार्य
शाळेत ग्रामस्थांच्या सहभागातून संगणक कक्ष, बैठक व्यवस्था यासह अन्य उपक्रम राबविण्यात येत आहेत. येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरोची व्यवस्था केली आहे. पत्रव्यवहारासाठी आॅनलाईनची व्यवस्था केली आहे. यासह अतिरिक्त शिक्षकांचा खर्च पालक उचलतात. तर शिपायाचे मासीक वेतन व विद्युत खर्च ग्रामपंचायतच्या सहकार्याने होत आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज प्रयोगशाळा
प्रत्येक उच्च माध्यमिक शाळेत प्रयोगशाळा असतात. मात्र दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्याचा अभ्यासक्रम असतो. जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनाही यांच्या शैक्षणिक जिवनातूनच प्रयोगशाळेचे महत्व व अभ्यास करता यावा याकरिता या शाळेने विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा तयार केली आहे. शालेय जीवनातून या विद्यार्थ्यांना त्याचे धडे या प्रयोगशाळेतून दिल्या जात आहे.
शालेय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधायुक्त व मुल्यमापनाचे धडे दिले जात आहे. भविष्यात विद्यार्थ्यांसाठी संगणक हाताळणे व त्यांना एमएससीआयटी प्रमाणपत्र परिक्षा देण्याचा अभ्यासक्रम सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिक्षक व ग्रामस्थांचा पुढाकारातून शाळेचा कायापालट झालेला आहे.
- संजय गाढवे, अध्यक्ष,
शाळा व्यवस्थापन समिती बेला.