आता शेतकऱ्यांना बसणार भारनियमनाचा फटका
By admin | Published: March 22, 2016 12:47 AM2016-03-22T00:47:16+5:302016-03-22T00:47:16+5:30
लाखनी तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने शेती फिडरवर १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे उन्हाळी धानपिक व भाजीपाल्याचे पीक वाचविणे अशक्य झाले आहे.
१६ तासांचे भारनियमन : उन्हाळी धानपीक संकटात, विद्युत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल
संजय साठवणे / चंदन मोटघरे साकोली / लाखनी
लाखनी तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने शेती फिडरवर १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे उन्हाळी धानपिक व भाजीपाल्याचे पीक वाचविणे अशक्य झाले आहे.
तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक उपअभियंत्यांना मराविमंच्या कार्यालयात मोर्चा नेला. उपअभियंता आंभोरे यांच्याची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहचले. त्यानंतर भारनियमन रद्द करण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अश्विनी जाधव यांना निवेदन दिले.
तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनाद्वारे आंदोलन करण्यात आले. रेंगेपार (कोठा) व परिसरात ५०० एकर शेतजमिनीवर धानपिकाचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली जात आहे.
यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे नापिकीमुळे शेतकऱ्यांना धान उत्पादन झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीवरील पंपाच्या मदतीने उन्हाळी धानपिकाची लागवड केली. मात्र पीक मोठे होत असताना विद्युत वितरण विभागाने १६ तासाचे भारनियमन सुरु केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक दिड महिन्यात धानाचे उत्पादन मिळेल. परंतु सध्या धानाला पाणी देणे आवश्यक आहे. विद्युत वितरण विभागाने भारनियमन सुरु केल्याने धानपिक वाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला निवेदन देऊन भारनियमन रद्द न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
विद्युत विभाग भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने भूजल पातळी खोल जाऊ नये यासाठी भारनियमन करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. माजी जि.प. सदस्य विजय खोब्रागडे यांनी विद्युत विभागाकडे भारनियमन रद्द करण्याची मागणी केली आहे.
शेतकरी संघटनेचे रतिराम हजारे, किरण काटगाये, घनश्याम हजारे, धनंजय लोहणरे, नंदलाल काडगाये यांनी विद्युत वितरण कार्यालय व तहसील कार्यालयात भारनियमन रद्द करण्याची मागणी केली आहे. भारनियमनाच्या प्रश्नावर तालुक्यातील हजारो शेतकरी गोळा झाले होते.
साकोली परिसरात १४ तासांचे भारनियमन
शेतकऱ्यांनी पावसाळी पिकाचे झालेले नुकसान उन्हाळी धानपिकातून मिळेल या अपेक्षेने उन्हाळी धानपिकाची लागवड केली. मात्र धान ऐन निसवणीवर येताच साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यात १४ तासांचे भारनियमन सुरु झाल्याने आता धानपिक कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
यावर्षी पावसाळ्यातही पाऊस नाहीच्या बरोबर आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसेबसे रोवणी करून पिक वाचविली. मात्र तलाव बोड्यातच पाणी नाही तर शेतकरी शेतीला पाणी तरी कुठून आणेल. अखेर पाण्याअभावी पावसाळी धानपिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकरी हवालदिल झाला. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेत पडला. शेवटी शेतकऱ्याला वाटले की शासन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना न्याय देईल. मात्र शासनाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला.
उपजिवीकेचे एकमेव स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांनी हार मानली नाही. कठाण पिकाची लागवड केली. मात्र जमिनीच सुकलेली असल्यामुळे कठाण मालही नाहीच्या बरोबर झाले. यानंतर शेवटचा यावर्षीचा प्रयोग म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. शेतकऱ्यांची रोवणी आटोपली. निंदन आटोपले, औषधी प्रकरणी, खत मारणी झाली व ऐन धानपिक उमेदीवर येताच वीज वितरण कंपनीने अचानक शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता १४ तासाचे भारनियमन सुरु केले. त्यामुळे आता उन्हाळी धानपिक पाण्याअभावी कसे होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.
अचानक सुरु झालेल्या भारनियमनामुळे शेतकरी नक्कीच अडचणीत सापडला. त्यामुळे या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मी तत्काळ ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी भेटणार आहे व सध्याही भारनियमन तत्काळ बंद करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार.
- बाळा काशिवार
आमदार, साकोली.