आता जिल्हा परिषद सभापतींसाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 05:00 AM2022-05-12T05:00:00+5:302022-05-12T05:00:46+5:30
विकास फाउंडेशन या भाजपाच्या फुटीर गटाला उपाध्यक्षपद मिळाल्याने आता त्यांना सभापतीपद मिळणार की नाही, त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षाला सभापतीपदी दिले जाणार काय अशी चर्चा आहे. काँग्रेसमध्ये मात्र अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव असलेले; परंतु ऐनवेळी दुसरेच नाव पुढे आल्याने नाराज झालेल्या सदस्याची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. काहीही असले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीएवढी सभापतीपदासाठीही आता काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच होणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर आता सभापतीपदी कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता लागली आहे. काँग्रेस आणि भाजपचा बंडखोर विकास फाउंडेशन यांच्यात सभापतीपदासाठी तडजोड झाली असून, त्यांना एक सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. येत्या १९ मे रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात ४ विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.
काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर करीत भाजपाच्या एका गटाला सोबत घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले, तर भाजपा बंडखोर गटाला उपाध्यक्षपद दिले. नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे, तर उपाध्यक्षपदी भाजपचे बंडखोर संदीप ताले विराजमान झाले. आता सभापतीपदासाठी कुणाची नावे पुढे येणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे २१ सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात आहेत, तर भाजपमधून बंडखोरी करीत आलेले पाच सदस्य आणि एक अपक्ष सदस्य आहे. यातून आता सभापतींची निवड केली जाणार आहे.
विकास फाउंडेशन या भाजपाच्या फुटीर गटाला उपाध्यक्षपद मिळाल्याने आता त्यांना सभापतीपद मिळणार की नाही, त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षाला सभापतीपदी दिले जाणार काय अशी चर्चा आहे. काँग्रेसमध्ये मात्र अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव असलेले; परंतु ऐनवेळी दुसरेच नाव पुढे आल्याने नाराज झालेल्या सदस्याची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. काहीही असले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीएवढी सभापतीपदासाठीही आता काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच होणार आहे. त्यातही महत्वाचे सभापतीपद मिळावे यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.
१९ मे रोजी सभापतींची निवडणूक
- जिल्हा परिषदेच्या विषय समिती पदाची निवडणूक १९ मे रोजी होत आहे. उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरीत विषय समित्यांच्या दोन सभापतींची निवड होणार आहे. सकाळी १० वाजतापासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. विशेष सभेची सुरुवात दुपारी २ वाजता होईल. त्यानंतर छाननी व उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया २.३० पर्यंत होणार आहे. आवश्यकता असल्यास २.३० वाजता मतदान घेण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहे.
राष्ट्रवादीही दाखल करणार नामांकन
- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीत सत्तेपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादीनेही सभापतीपदासाठी नामांकन भरण्याची तयारी सुरू केली आहे. आता राष्ट्रवादी तर्फे कोण नामांकन दाखल करणार याची उत्सुकता आहे. परंतु बहुमत काँग्रेस आणि विकास फाउंडेशनकडे असल्याने राष्ट्रवादीचा सभापती होण्याची शक्यता दिसत नाही.