आता कानाला बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:33+5:302021-06-25T04:25:33+5:30
भंडारा : कोरोनानंतर विविध लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहे. अशा स्थितीत नाक, डोळे व घसा यामध्ये परिणाम दिसून येतात. ...
भंडारा : कोरोनानंतर विविध लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत आहे. अशा स्थितीत नाक, डोळे व घसा यामध्ये परिणाम दिसून येतात. मात्र वातावरणातील बदलामुळे कानामध्ये बुरशी आणि बॅक्टेरियाचा धोका उदभवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. परिणामी प्राथमिक स्वरूपात काही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला व उपचार करून घ्यावा, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन सध्या लसीकरणाच्या बाबतीत वेगाने पाऊल टाकत आहेत. मात्र, कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये बुरशी व बॅक्टेरियाचा धोका होऊ शकतो. याबाबत तज्ज्ञांना बोलते केले असता, नाक व ओलावा असलेल्या शरीरातील भागात बॅक्टेरियाचा शिरकाव होऊ शकतो. वेळप्रसंगी प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तोच आजार गंभीर स्वरूप प्राप्त करू शकतो. भंडारा जिल्ह्यात गत आठवड्यात म्युकरमायकोसीसचे १३ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यूसुद्धा झाला आहे. विशेष म्हणजे दोन रुग्णांचे डोळेही कायमस्वरूपी निकामी झाले आहेत. त्यामुळे अशा लक्षणांनी बाबतीत कोणत्याही स्थितीत दुर्लक्ष करू नये, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बॉक्स
काय घ्याल काळजी
प्राथमिक स्वरूपात लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेकदा लक्षणे आढळल्यानंतरही नागरिक किंवा किंवा रुग्ण अनेकदा वैद्यकीय सल्ला घेणे टाळतात. हीच बाब अंगावर येऊ शकते. त्यामुळे अतितात्काळ रूपात याबाबत उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बॉक्स
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प झाली असती तरी कोरोना झालेल्या व दीर्घकाळ आयसीयूमध्ये असलेल्या ५० वर्षांवरील रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसची अशी लक्षणे आढळू शकतात. पावसाळ्याच्या दिवसात शरीरात ओलावा असल्यामुळे काळजी घेणे अपेक्षीत आहे. परिणामी अशावेळी सजग राहून लक्षणे ओळखून त्यावर औषधोपचार करावे परंतु कुठल्याही बाबतीत घाबरून जाण्याचे कारण नाही. प्राथमिक स्वरूपात काळजी घेतल्यास ते गंभीर स्वरूप प्राप्त करत नाही. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात थोडी फार काळजी घेणे आवश्यकच असते.
कोट बॉक्स
वातावरणातील बदलामुळे कानात बुरशी आढळते. त्याचा कोरोनाशी शक्यतोवर कुठलाही संबंध नाही. रोगाची प्राथमिक लक्षणे आढळली तर त्यात दिरंगाई करू नका तत्काळ स्वरूपात वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा प्राथमिक स्वरूपात लक्षणे आढळून त्यावर उपचार केल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.
-डॉ. प्रमोद धुर्वे, ईएनटी तज्ज्ञ, भंडारा
कोट बॉक्स
दीर्घकाळ आयसीयू किंवा ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांना म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळतात. सध्या कानात बुरशी किंवा बॅक्टेरिया आढळून येते. नाक, डोळे यामध्ये म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळतात. ओलावा असलेल्या शरीरातील भागात बुरशीचा धोका असू शकतो. जास्त प्रमाणात स्टेराईड घेतल्यामुळे रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन त्याचा परिणात होऊ शकतो..
-डॉ. अमित कावळे, भंडारा