आता मंडई उरली केवळ बाजार आणि नाटकांसाठी
By admin | Published: November 18, 2015 12:47 AM2015-11-18T00:47:06+5:302015-11-18T00:50:06+5:30
काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण, ग्रामीण भागात दिवाळीच्या मुहूतार्पासून सुरू होणाऱ्या मंडई उत्सवात आता म्हणावी तेवढी मजा राहिली नाही.
हंगाम मंडईचा : ग्रामीण भागात कार्यक्रमांची रेलचेल
लाखांदूर : काळाचा महिमा म्हणा किंवा अन्य काही पण, ग्रामीण भागात दिवाळीच्या मुहूतार्पासून सुरू होणाऱ्या मंडई उत्सवात आता म्हणावी तेवढी मजा राहिली नाही. या मंडई उत्सवाची जागा आता केवळ बाजार आणि नाटकांनी घेतली आहे.
पूर्व विदभार्तील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात धानाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. धानाचा हंगाम साधारणत: जुलैपासून सुरू होतो आणि नोव्हेंबरला संपतो. यावेळेस शेतकरी वर्ग मोकळा असतो आणि धानाच्या रूपाने लोकांच्या हातात पैसा येण्यासाठी सुरुवात झालेली असते. या मोकळ्या वेळेचा उपयोग वेळ घालविण्यासाठी मंडईच्या रूपाने व्हावा. त्याचबरोबर परंपरेने चालत आलेल्या लोककलांचे जतन व्हावे, यासाठी मंडईची प्रथा पडली असावी.
लाखांदूर, लाखनी, साकोली तालुक्यात दिवाळीच्या मुहूर्तावर मंडईचे आयोजन होते. तालुक्यातील अनेक गावांत त्या-त्या गावांच्या सोयीने मंडई भरविण्यात येते. मंडईचा हा सिलसिला डिसेंबर महिण्यापर्यंत सुरु असतो. दोन-तीन दशकापूर्वी मंडई म्हटले की वेगळाच उत्साह असायचा मंडईमध्ये गावच्या दंडार मंडळास सहभागी व्हायचे आहे, म्हणून १५ दिवसापूर्वी पासूनच पूर्वतयारी करण्यात येत होती. मंडईच्या आदल्यादिवशी त्याची रंगीत तालीम म्हणून ‘भडकी दंडार’ सादर व्हायची. तत्पूर्वी ज्या गावात मंडईचे आयोजन होते. त्या गावची आयोजक मंडळी गावोगावच्या दंडार मंडळांना खास निमंत्रण पाठवायचे आणि मंडई उत्सवात किमान १० ते १५ दंडार मंडळे सहभागी व्हायचे आणि लोककलेचे दर्शन घडवायचे. पण हे दिवस आता संपल्यात जमा आहेत. दंडार मंडळे आता दिसेनाशी झाली आहेत. अपवादाने एखादा मंडळ या मंडईत हजेरी लावत असतो. आता या मंडईची जागा केवळ बाजार आणि रात्रीच्या नाटकांनी घेतली आहे. ज्या गावात मंडईचे आयोजन असते त्या गावात हमखास नाटकांचे आयोजन असते. (तालुका प्रतिनिधी)