चिमुकल्यांसाठी आता ‘मस्ती की पाठशाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:46+5:302021-05-29T04:26:46+5:30
तुमसर : कोरोना कालखंडात चिमुकले विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. घरीच त्यांना शाळेसारखे वातावरण मिळावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, आहार व ...
तुमसर : कोरोना कालखंडात चिमुकले विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. घरीच त्यांना शाळेसारखे वातावरण मिळावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, आहार व अन्य बाबींकरिता ॲक्टिव्ह टीचर्स संघटनेने जिल्ह्यातील चिमुकल्यांसाठी ‘मस्ती की पाठशाला’ हा उपक्रम राबविणे सुरू केले आहे. यात ६ ते १४ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.
शिक्षण विभागाचे ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ असे घोषवाक्य असून, शिक्षण विभाग कोरोना कालखंडात नवनवीन उपक्रम घेऊन येत आहे. अशातच राज्यस्तरावर ‘ॲक्टिव्ह टीचर संघटना ही सक्रिय असून त्यांनी मस्ती की पाठशाला हे नवीन उपक्रम भंडारा जिल्ह्याकरिता सुरू केले आहेत. यात सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम मोफत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांना योग, प्राणायाम, आहार, विविध स्पर्धा, गाणी गोष्टी, मुलाखत, कागदकाम, विज्ञानाचे प्रयोग, इंग्लिश ॲक्टिव्हिटी, अभिनय, संवाद, बाहुली नाट्य, गणितातील गमतीजमती यांचा या उपक्रमात समावेश आहे.
प्रथम भंडारा जिल्ह्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांकरिता ही ‘मस्ती की पाठशाला’ सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता ॲक्टिव्ह टीचर संघटनेने एक लिंक दिलेली असून, त्या लिंकला जॉइन केल्यावर शिक्षक, पालक व चिमुकले विद्यार्थी या ‘मस्ती की पाठशाला’चे घटक होऊ शकतात. ॲक्टिव्ह टीचर संघटनेचे विक्रम अडसूळ हे या उपक्रमाचे संयोजन आहेत. याकरिता ॲक्टिव्ह टीचर संघटनेचे अन्य पदाधिकारीही यात परिश्रम घेत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील ६ ते १४ वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांकरिता ‘मस्ती की पाठशाला’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात चिमुकल्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याकरिता एक लिंक देण्यात आली आहे. यात विद्यार्थी, पालक, शिक्षक ‘मस्ती की पाठशाला’ या उपक्रमात सहभागी होऊ शकतात.
विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी, तुमसर.