आता भंडाऱ्याचे ‘फिरते पोलीस ठाणे’ पॅटर्न राज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:25 PM2017-12-26T22:25:05+5:302017-12-26T22:25:23+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम २६ जानेवारी २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य जनतेकरिता ‘फिरते पोलीस ठाणे’ हा उपक्रम २६ जानेवारी २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला ग्रामीण भागातून व्यापक प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. आता हा उपक्रम आता राज्यात राबविण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाद्वारे गावाच्या विकास प्रक्रियेत अडसर ठरणाऱ्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात निर्माण झालेले दिवाणी, महसुली, फौजदारी, जुने भांडणे हे पोलीस व लोकसहभागातून सामंजस्यातून मिटविले जात आहेत. त्यामुळे ‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमामुळे गावातील वादविवाद, भांडणे सामंजस्याने मिटविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. पोलीस ठाण्यापर्यंत सर्वसामान्य जनता, ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, महिला, लहान मुले-मुली जे आपली तक्रार देण्याकरिता जात नव्हते अशा पीडित व्यक्तींना फिरते पोलीस ठाण्यामुळे जवळीक निर्माण झाली आहे.
‘भंडारा पोलीस आपके साथ भी... आपके पास भी...’ हे ‘फिरते पोलीस ठाणे’ या संकल्पनेचे घोषवाक्य आहे.
सदर फिरते पोलीस ठाणे दर शनिवारला ग्रामीण भागातील जास्त अंतरावर असलेल्या ठिकाणी जावून त्याठिकाणी तंबू टाकून तेथील नागरिकांच्या तक्रारी, समस्यांची नोंद करून त्याचवेळी तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे.
फिरते पोलीस ठाण्यामध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच, पोलीस मित्र व गाव पातळीवरील शासकीय कर्मचारी उपस्थित राहतात. जनमानसात पोलिसांबद्दल असलेली भीती कमी व्हावी, पोलिसांद्वारे विविध योजनेची जनजागृतीबाबत मंच उपलब्ध व्हावा यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सोयीस्कर ठरत आहे.
३४ हजार लोकांचा सहभाग
२८ जानेवारी २०१७ पासून १६ डिसेंबर २०१७ पर्यंत एकूण १७ पोलीस ठाण्यामध्ये ७४९ फिरते पोलीस ठाणे कॅम्प आयोजित करण्यात आले. सदर कॅम्पमध्ये एकूण ३४ हजार लोकांनी सहभाग घेऊन एकूण १९७ तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त तक्रारींचा निर्वाळा करून तक्रारकर्त्यांचे समाधान करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षकांना गौरविले
‘फिरते पोलीस ठाणे’ या उपक्रमाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन पोलीस अधीक्षक विनिंता साहू यांचा त्यांनी नागपूर येथे गौरव केला. यावेळी आ.डॉ.परिणय फुके, आ.चरण वाघमारे, आ.बाळा काशिवार, आ.रामचंद्र अवसरे, मुख्य सचिव सुमित मलीक, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते.
गुन्ह्यात घट झाल्याचा दावा
फिरते पोलीस ठाणेमुळे जनतेमध्ये कायद्याबद्दल व स्त्री अत्याचाराबद्दल जनजागृती करण्यात येत आहे. दिवाणी स्वरूपाचे छोटेमोठे वाद सामंजस्याने सोडविले जात असल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत सन २०१७ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान घडलेल्या गुन्ह्यांपैकी खूनाच्या १४ घटना, चोरीच्या ७३, फसवणूकीच्या १०, बलात्कार ६ अशा गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.
गुन्हे उघडकीस आणण्याचे तसेच मालमत्ता हस्तगत करण्याच्या प्रमाणात पोलिसांना यश आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.