आता लेकीची चिंता मिटवा, सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 02:34 PM2024-11-14T14:34:02+5:302024-11-14T14:35:28+5:30
पोस्ट विभागाची योजना : मुलींचे भविष्य होते सुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुलींच्या भविष्याची चिंता प्रत्येक पाल्याला सतावत असते. मुलींचे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लग्न अशी अनेक कर्तव्ये पार पाडण्यासाठी पालकांना मोठी आर्थिक तरतूद करावी लागते. या चिंतेतून पालकांना मुक्त करण्यासाठी पोस्ट कार्यालयाने सुकन्या समृद्धी योजना यापूर्वीच सुरू केली आहे. जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक मुलींची खाती उघडण्यात आली आहेत. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना लाभदायक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या नावे टपाल कार्यालयात बचत खाते काढावे लागते. हे खाते २१ वर्षांनंतर परिपक्व होते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर जमा झालेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम शिक्षणासाठी काढता येते. तर मुलीला २१ वर्षे झाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते. या योजनेच्या लाभासाठी पोस्ट कार्यालयात अथवा बँकेत जाऊन मुलींच्या नावे खाते उघडता येते. खाते उघडताना मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलगी व पालकांचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, दस्तऐवज आदी कागदपत्रांची आवश्यकता असते.
सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्य
मुलीच्या नावे पोस्ट कार्यालयात बचत खाते उघडावे लागते. हे खाते २१ वर्षांनंतर परिपक्च होते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर जमा रकमेतून ५० टक्के रक्कम तातडीने काढता येते.
मुलीच्या दहा वर्षांआधी काढा खाते
पोस्ट विभागाची ही एक बचत योजना आहे. मुलगी १० वर्षाची होईपर्यंतच तिच्या नावे खाते उघडता येते. खाते उघडल्यानंतर मुलीच्या नावे मासिक किमान २५० तर कमाल १.५० लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.
लेकीचे भविष्य होते उज्ज्वल
मुलगी १८ वर्षाची झाली की पालकांना तिच्या भविष्याची चिंता लागते. मुलीला डॉक्टर, वकील, उच्च अधिकारी बनविण्याबरोबरच शिक्षणासाठी परदेशी शिक्षणासाठी मोठी तरतूद करावी लागते. अशा पालकांचा सुकन्या समृद्धी योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
"जिल्ह्यात पोस्ट कार्यालयामार्फत सुकन्या समृद्धी योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे."
- शंकर निंबार्ते, जिल्हा पोस्ट मास्तर, भंडारा