आता ग्रामीण भागातलीही पोरं होणार अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:41+5:302021-01-03T04:35:41+5:30
राहुल भुतांगे तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा ...
राहुल भुतांगे
तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा या परीक्षेसाठीच्या अभ्यासाची योग्य दिशा सापडतच नाही. तीच योग्य दिशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावी या उदात्त हेतूने गोबरवाही ठाणेदारांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. आता ग्रामीण भागातील पोरंही अधिकारी हाेणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.
संपूर्ण जग हे स्पर्धेचे आहे. माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, संगणकाचे युग आहे. हे आपण सतत ऐकतो, वाचतो आहोत. आयुष्य हीच जणू स्पर्धा आहे. हे जवळजवळ बरेचजण अनुभव घेत आहेत. ऐन तरुण वयातील काळ म्हणजे सुवर्णकाळच आहे. हा काळ काही केल्या पुन्हा परत येणार नाही. म्हणूनच या वयात आपल्या आयुष्याचे सोने करायला हवे. हा काळ म्हणजे जीवनध्येय निश्चितीचा काळ आहे ग्रामीण भागातील मुलांना योग्य ते मार्गदर्शन व शिक्षण मिळत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेत तो टिकाव धरू शकत नाही. मग त्यांच्या जीवनात नैराश्य येते आणि तेच ग्रामीण भागातील पोरातून काढण्यासाठी गोबरवाही पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार दीपक पाटील यांनी पुढाकार घेतला. ठाण्यांतर्गत येत असलेल्या सर्व गावांना भेटी देऊन तेथील तरुण पिढीला भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. पोलीस भरती करिता ग्रामीण युवकांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे.
बाॅक्स
दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा
परीक्षा केंद्रात दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रिंटेड प्रश्नपत्रिका, प्रिंटेड उत्तरपत्रिका, निकाल व पहिले तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ चषक देणार येणार आहेत. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आपला अभ्यास किती झाला याचे मूल्यमापन सहज करता येईल, तसेच चाचणीला परिसरातील जास्त विद्यार्थी आल्यामुळे आपला अभ्यास नेमका किती आहे, याचे व्यापक अर्थाने मूल्यमापन हाेईल. मोठ्या शहरात जाऊन टेस्ट सिरीज लावण्याचा खर्च व वेळही वाचणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व व्यापक मार्गदर्शन विनामूल्य मिळणार आहे.