आता गाव विकासासाठी मिळणार चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:42 AM2018-02-02T00:42:06+5:302018-02-02T00:42:18+5:30
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तावर भंडारा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत रावणवाडी, सिल्ली, पहेला, जाख, दाभा, सुरेवाडा, आंबाडी या सात ग्रामपंचायतींना आयएससो मानांकन प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्तावर भंडारा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत रावणवाडी, सिल्ली, पहेला, जाख, दाभा, सुरेवाडा, आंबाडी या सात ग्रामपंचायतींना आयएससो मानांकन प्राप्त झाले आहे. सुविधांनी युक्त अद्ययावत इमारत, कार्यालयीन कामाचे नियोजन, ग्रामस्थांना सुविधा पुरवठा करणे या दृष्टीकोनातून कार्यरत या सातही ग्रामपंचयतींना आयएसओ मानांकन मिळाले आहे.
‘गाव करी ते राव ना करी’या उक्तीप्रमाणे ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना शिखरावर पोहचविले. ग्रामपंचायत ंच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी भंडारा पंचायत समिती अंतर्गत गणेशपूर व बेला या ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
आयएसओ मानांकनाचा दर्जा मिळविण्याकरिता या सातही ग्रामपंचायतींनी नियोजनबद्ध कामे करून कामामध्ये सातत्य ठेवले आहे. या सातही ग्रामपंचायतींनी आयएसओ ग्रामपंचयत करण्याच्या अनुषंगाने सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि विशेषत: ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन नियोजन करून प्रत्येकानेच खारीचा वाटा उचलत दिलेल्या योगदानामुळेच या ग्रामपंचायतींना हा बहुमान मिळाला आहे.
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच या ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळाले आहे. विशेषत: विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे यांच्या मार्गदर्शनात हे यश प्राप्त करता आले. या ग्रामपंचायतींचा इतर ग्रामपंचायतींनी आदर्श घ्यावा.
- सत्येंद्र तामगाडगे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती भंडारा.
लोकाभिमुख प्रशासन, गावकऱ्यांच्या सेवेसाठी गतिमानतेला प्राधान्य, नियोजनबद्ध कामे, कार्यतत्परता व इच्छाशक्ती या बाबींची सांगड घालून ग्रामपंचायतींनी यश मिळविले आहे. ही गौरवास्पद व अभिमानाची बाब आहे.
-प्रमोद हुमणे, विस्तार अधिकारी पंचायत भंडारा.