आता मतदार दिवस म्हणून पाळणार
By admin | Published: June 7, 2017 12:30 AM2017-06-07T00:30:06+5:302017-06-07T00:30:06+5:30
तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी लोकशाहीच्या बळकटीकरणास चालना देण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने १ जुलैपासून महिनाभर नवमतदारांची मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमांचे आयोजन : ९ ते २२ जुलैपर्यंत विशेष मतदार नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी लोकशाहीच्या बळकटीकरणास चालना देण्यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने १ जुलैपासून महिनाभर नवमतदारांची मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोहिम राबविण्यात येत आहे.
प्रत्येक वर्षी १ जुलै हा दिवस राज्य मतदार दिवस साजरा करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी ठरविले आहे. या मोहिमेंतर्गत १ जुलै ते ३१ जुलै २०१७ या महिनाभराच्या काळात १८ ते २१ वर्ष वयोगटातील नवयुवक मतदारांची नाव र्नेंदणी करण्याची मोहिम सुरु होत आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदार यादीत नाव नसलेल्या तरुणांकडून अर्ज क्रमांक ६ भरून घेतील.
नागरिकांच्या सोयीसाठी ९ ते २२ जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिम आयोजित केली आहे.या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांनी नोंदविलेले अर्ज स्वीकारणार आहेत. राजकीय पक्षांनी या मोहिमेत सहभागी होऊन मतदार नोंदणी करावी. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयीन युवकांमध्ये मतदार नोंदणीबाबत जागृती निर्माण होण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत मतदार यादीतील मय्यत, दुबार व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी अर्ज नमूना ७ भरून द्यावा. ज्यांच्या मतदार यादीतील नावात चुका असल्यास, त्यांनी अर्ज क्रमांक ८ भरून द्यावा. ज्यांचे मतदार यादीत फोटो नाही अशा मतदारांनी तहसील कार्यालयात जमा करावे. ज्या महिलांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली नाही. त्यांनीही या मोहिमेत भाग घेऊन नाव मतदार यादीत नोंदीकरिता नमुना अर्ज क्रमांक ६ भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.