आता मजुरांना गावातच मिळणार रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2016 12:21 AM2016-08-20T00:21:30+5:302016-08-20T00:21:30+5:30
ग्रामसभेला सर्वोत्तम स्थान देण्यात आले आहे. ग्रामसभेला दिलेल्या अधिकारामुळे अनेक गावांचा विकास झालेला बघायला मिळत आहे.
शिवणी ग्रामपंचायतीचा ठराव : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शासकीय योजनांचीही दिली माहिती
भंडारा : ग्रामसभेला सर्वोत्तम स्थान देण्यात आले आहे. ग्रामसभेला दिलेल्या अधिकारामुळे अनेक गावांचा विकास झालेला बघायला मिळत आहे. शिवणी (मोगरा) ग्रामपंचायतीने या ग्रामसभेचे महत्व ग्रामस्थांना सांगितले. यावरून ग्रामस्थांनी गावातील मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागत असल्याने मजुरांच्या हाताला गावातच काम मिळावे, यासाठी सभेत सर्वानुमते ठराव पारित केला. यामुळे आता ‘गाव करी, सो राव ना करी’, ही उक्ती शिवणीत बघायला मिळणार आहे.
लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) हे आडवळणावरील गाव. या गावाने शासकीय योजना गावात आणून त्यातून गावकऱ्यांना त्यांचा लाभ दिला. ग्रामपंचायतीच्या पुढकारातून गाव ‘सुजलाम् सुफलाम’ होत आहे. ग्रामस्थांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीने घेतल्या पुढाकाराची दखल प्रशासनाने घेतली. गावात केलेल्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची दखल खुद्द केंद्र व राज्य शासनाने घेवून ग्रामपंचायतीला नानाविध पुरस्काराने गौरविले आहे. अशा या ग्रामपंचयातीने ग्रामसभेत आता गावातील मजुरांच्या हाताला गावातच काम देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्याची भूमिका घेतल्याने कदाचित जिल्ह्यातील शिवणी हे पहिले गाव ठरू शकते.
गाव विकासाची जबाबदारी ग्रामसचिव म्हणून जयंत गडपायले व सरपंच माया कुथे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर आहे. त्यांच्या कल्पनेतून गावात अनेक योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळत आहे. ग्रामसभेला सरपंच माया कुथे, सचिव जयंत गडपायले, उपसरपंच सतिश शेंडे, ग्रामपंचायत सदस्य जिवनदास नागलवाडे, भिमराव खांडेकर, गिता शेंडे, रेखा लांडगे, रत्नमाला खांडेकर, पोलीस पाटील रोहिदास कुनभरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष राघो शेंडे, देवस्थान समिती अध्यक्ष डोलीराम हारगुडे, तलाठी डांबरे, रोजगार सेवक हेमराज शेंडे, संगणक परिचालक संदिप शेंडे यांच्यासह शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राघो शेंडे यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
१० वी १२ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील विद्यार्थ्यांच्या तलनेत गावातील विद्यार्थीही कोणत्याही बाबतीत कमी पडू नये, अथवा कोणत्याही प्रकारचा न्युनगंड त्यांच्या मनात राहू नये, याकरिता हा सत्कार करण्याचा कार्यक्रम घेण्यासाठी ग्रामपंचयायतीने पुढाकार घेतला आहे. यात जतीन वाघाये, लोचना शेंडे, निशा शेंडे, आदित्य येरपुडे, कल्यानी मोहतुरे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कल्यानी मोहतुरे ही तालुकास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आली आहे.
या योजनांचा मिळणार ग्रामस्थांना लाभ
शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. त्यात समाजकल्याण, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, एकात्मिक बालविकास प्रकल्प आदी विभागांच्या योजनांची लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ग्रामसभेतून निवड करण्यात आली. सन २०१७-१८ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनांतर्गत करावयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. यासोबतच ११ कलमी कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक योजनांचाही लाभ मिळणार आहे.