आता मागेल त्याला पोल्ट्री व गोटफार्म देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:56 PM2017-12-20T23:56:45+5:302017-12-20T23:57:19+5:30
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याचा नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डमध्ये समावेश नव्हता.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्याचा नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डमध्ये समावेश नव्हता. आता या जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्यामुळे दुधाच्या उत्पादनात वाढ होईल. महाराष्ट्रात आंध्रप्रदेशातून अंडी मागविण्यात येत होती. परंतु पुढील वर्षात राज्यातच अंडी उपलब्ध करून देण्यात येतील. मागेल त्याला शेततळे या योजनेप्रमाणे आता मागेल त्याला पोल्ट्रीफार्म व मागेल त्याला गोटफार्म योजना राबविणार आहे, असे प्रतिपादन पशु संवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग व भंडारा पंचायत समितीच्या विद्यमाने मानेगाव येथे पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ.डॉ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, कृषी सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, सभापती प्रल्हाद भुरे, पशुसंवर्धन उपायुक्त सुरेश कुंभरे, पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, मानेगावचे सरपंच प्रभाकर बोदेले उपस्थित होते.
यावेळी ना.जानकर म्हणाले, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाच्या सर्व योजना आता आॅनलाईन करण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात वाढीव मागणी सादर करणार आहे. शेतीसोबतपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व मत्स्यशेतीकडे लक्ष देऊन शेतकºयांचा आर्थिकस्तर उंचावण्यावर भर देण्याचा शासनाचा निर्धार आहे. पशुपालकांना योजनांचा लाभ देण्यासाठी व शेतकºयांचे उत्पन्न वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. या विभागात तलाव तेथे मासोळी अभियान राबवून मत्स्य व दुग्ध व्यवसायास चालना दिल्याबद्दल विभागीय आयुक्त अनुपकुमार व जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे अभिनंदन केले.
यावेळी आ.परिणय फुके म्हणाले, पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळावे गावागावात घेण्याची गरज आहे. धानासोबत पुरक व्यवसाय म्हणून मत्स्यशेती व दुग्ध व्यवसाय करावा. आपल्या जिल्ह्यात सव्वातीन लाख दुधाचे उत्पादन होते ते साडेचार लाखावर कसे नेता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात दुग्ध उत्पादनाचा मोठा प्रकल्प उभारावा, अशी मागणी त्यांनी ना.जानकार यांना केली. यावेळी आ.अवसरे, सभापती नरेश डहारे यांनी मार्गदर्शन केले.
प्रस्ताविकात नितीन फुके यांनी मेळाव्याची माहिती सांगितली. यावेळी पशुपालक व कुक्कुटपालक शेतकºयांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या पशुपक्षी प्रदर्शनीत पशुंच्या वेगवेगळया जातीचा समावेश होता. या मेळाव्याला विविध विभागाचे अधिकारी, शेतकरी, गावकरी व विद्यार्थी उपस्थित होते.