आता तुम्हीच सांगा साहेब, एकरी किती धान पिकवायचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 05:00 AM2022-06-06T05:00:00+5:302022-06-06T05:00:37+5:30
जिल्ह्यात उशिरा का होईना उन्हाळी धान खरेदीचा प्रारंभ संस्थांनी केला होता. वास्तविक पाहता १ मे ते १ जून यादरम्यान उन्हाळी हंगामातील धान खरेदी गरजेची होती; परंतु अल्पावधीतच आनंदावर विरजन पडले. हमीभाव खरेदी केंद्र बंद अचानक बंद पडले. त्याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून एकरी धान खरेदी बाबत निश्चितता नव्हती. यावेळी प्रथमच एकरी आठ क्विंटल धान खरेदी करण्यात येईल, असा निर्णय घेतला.
युवराज गोमासे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी एकरी धान खरेदीच्या उद्दिष्टाबाबतचे नवे परिपत्रक जारी केले आणि चार दिवसांपूर्वी सुरू झालेले उन्हाळी धान खरेदी केंद्र अचानक बंद झाले. धान खरेदीबाबतच्या निर्णयाने खरेदीदार संस्था व धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. खरेदीवरून जिल्ह्यात गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे आता आता तुम्हीच सांगा साहेब, एकरी किती धान पिकवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांचा विचारत आहे.
जिल्ह्यात उशिरा का होईना उन्हाळी धान खरेदीचा प्रारंभ संस्थांनी केला होता. वास्तविक पाहता १ मे ते १ जून यादरम्यान उन्हाळी हंगामातील धान खरेदी गरजेची होती; परंतु अल्पावधीतच आनंदावर विरजन पडले. हमीभाव खरेदी केंद्र बंद अचानक बंद पडले. त्याचा परिणाम खरिपाच्या हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून एकरी धान खरेदी बाबत निश्चितता नव्हती. यावेळी प्रथमच एकरी आठ क्विंटल धान खरेदी करण्यात येईल, असा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांचा व संस्थाचालकांचा विरोध वाढीस लागल्याने आठ क्विंटल धान खरेदीची मर्यादा हटविण्यात आली. पूर्वीप्रमाणे धान खरेदीचे निर्देश परिपत्रकातून देण्यात आले. संस्थाचालकांनी मोठ्या थाटात धान खरेदीचा प्रारंभ केला. मात्र, चार दिवस उलटत नाही तोच धान खरेदीबाबतचे नवे निर्देश प्राप्त झाले. निर्देशानुसार ४ लाख ९१ हजार ९९६ क्विंटल खरेदी करण्यास कळविण्यात आले. मात्र, प्रती एकर किती धान खरेदी करायचे, याचा अर्थबोध त्यातून होत नव्हता. परिणामी शेतकरी व संस्थाचालकांत गोंधळाची स्थिती आहे. जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी नोंदणीकृत ५९ हजार ६८५ शेतकऱ्यांकडून धान खरेदीचे निर्देश संस्थांना दिले आहेत. त्यानुसार प्रती शेतकरी ८.२५ क्विंटल खरेदी करावे, असा होतो. यामुळे दोन दिवसांतच धान खरेदी केंद्र बंद पडले आहे.
धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची गरज
- जिल्ह्यात रब्बी हंगामात एकरी १५ ते २० क्विंटल धानाचे उत्पादन होते; परंतु आठ क्विंटल धान विकल्यावर उरलेल्या धानाची विक्री कुठे करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचा हमीभाव १९४० रुपये आहे; परंतु कोणताही खासगी व्यापारी हमीभावात धान घेणार नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात धानाची विक्री करावी लागेल. शेतकऱ्यांकडे धान साठविण्यासाठी गोदामे उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यामुळे धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची गरज आहे.