एनएसएस विद्यार्थी शाळाबाह्यांच्या ‘शोधार्थ’
By admin | Published: January 30, 2016 12:50 AM2016-01-30T00:50:34+5:302016-01-30T00:50:34+5:30
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेत शिक्षण विभागाने ....
स्वयंसेवी संस्थांनाही दिले महत्त्व : ८५९ गावांमध्ये शोध मोहीम, शाळाबाह्य २५ विद्यार्थी सापडले, मोहिमेचा आज शेवट
प्रशांत देसाई भंडारा
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेत शिक्षण विभागाने आता राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे. जिल्ह्यातील ८५९ गावातून ही मोहिम राबविण्यात येत असून यासाठी एनएसएसचे २ हजार ७८१ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडून त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने नानाविध योजना अंमलात आणल्या आहेत. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना परिस्थितीमुळे किंवा अन्य कुठल्या कारणाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर रहावे लागत आहे. अशा विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यासाठी व एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने राज्यभर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहिम नोव्हेंबर महिन्यात राबविली होती. या महिमेत शिक्षण विभागाला बऱ्यापैकी यश आले. त्यानंतर दुसरी शोध मोहिम राबविण्यात आली. या दोन्ही मोहिमेत जिल्ह्यात २४९ शाळाबाह्य विद्यार्थी आढळले.
यानंतरही अनेक ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधार्थ शिक्षण विभागासोबत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांचा व स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली आहे. ही शोध मोहिम उद्या ३० जानेवारीपर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही मोहिम जिल्ह्यातील ८५९ गावांमधून राबविण्यात येत आहे.
या मोहिमेसाठी एनएसएसचे २ हजार ७८१ स्वयंसेवकांची मदत घेतली असून १३३ समन्वयक व सात सनियंत्रन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात २५ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे या शोध मोहिमेत आढळून आले आहे. यात सर्वाधिक १९ मुले भंडारा तालुक्यात तर मोहाडी पाच व तुमसर येथे एक विद्यार्थी आढळला आहे.
पहिल्या सर्वेक्षणात आढळलेल्या २४९ शाळाबाह्य मुलांपैकी २२१ मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. तर उर्वरित ५३ मुले त्यांच्या मुळ जिल्ह्यात किंवा राज्यात परत गेल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. या सर्वेक्षणातील मुलांनाही शाळेत दाखल करून घेण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्था व एनएसएस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच असा सर्वे होत असल्याने त्यांच्या सर्वेक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.