ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४२७९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:54+5:302021-05-14T04:34:54+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. गत महिन्यात १३ ...
भंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. गत महिन्यात १३ हजारांपर्यंत पोहोचलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी ४२७९ वर आली होती. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे सध्या आशादायक चित्र आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५३८ जणांनी कोरोनावर मात केली तर सात जणांचा मृत्यू आणि २१८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आले.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. महिनाभरात ३३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. परिणामी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढत गेली. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ हजारांपर्यंत पोहोचली होती. मात्र मे महिना उजाडताच रुग्णसंख्या घटू लागली. त्यासोबतच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. सध्या जिल्ह्यात असलेल्या ४२७९ रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यात १२९०, मोहाडी १९१, तुमसर ४५२, पवनी ३०६, लाखनी ५३२, साकोली १३३९ आणि लाखांदूर तालुक्यात १६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
गुरुवारी जिल्ह्यात २१२२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ६६, मोहाडी १३, तुमसर २५, पवनी १६, लाखनी १७, साकोली ५७ आणि लाखांदूर तालुक्यात २४ रुग्ण असे २१८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ६२ हजार ४३४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ५६ हजार ९०५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी ५१ हजार ६१९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे, तर १ हजार ७ व्यक्तींचा मृत्यू झाला. गुरुवारी भंडारा तालुक्यात ४, तुमसर, साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
बाॅक्स
५१ हजार ६१९ रुग्णांची कोरोनावर मात
भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार ६१९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील २२ हजार २०५, मोहाडी ३९२७, तुमसर ६३४६, पवनी ५४६९, लाखनी ५६६४, साकोली ५४६६ आणि लाखांदूर तालुक्यातील २५४२ व्यक्तींचा समावेश आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात १००७ व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले. त्यात भंडारा ४७६, मोहाडी ९१, तुमसर १०८, पवनी १००, लाखनी ८७, साकोली ९७, लाखांदूर येथील ४८ व्यक्तींचा समावेश आहे.