जिल्ह्यात हत्तीरुग्णांची संख्या चार हजारांवर
By admin | Published: December 30, 2014 11:27 PM2014-12-30T23:27:55+5:302014-12-30T23:27:55+5:30
डासांमुळे हत्तीरोगाची लागण होते. क्युलेस डासाची मादी याचा प्रसार करण्यास कारणीभूत असते. दूषित डास वारंवार चावल्यानंतर हत्तीरोगाची लागण होते. जिल्ह्यात ४,४३१ हत्तीरोग रूग्ण आहे.
प्रशांत देसाई - भंडारा
डासांमुळे हत्तीरोगाची लागण होते. क्युलेस डासाची मादी याचा प्रसार करण्यास कारणीभूत असते. दूषित डास वारंवार चावल्यानंतर हत्तीरोगाची लागण होते. जिल्ह्यात ४,४३१ हत्तीरोग रूग्ण आहे. यात पवनी तालुक्यात सर्वाधिक ८७६ रूग्ण असून तुमसर शहरात सर्वात कमी ४९ रूग्ण आहेत.
जागतील आरोग्य संघटनेनुसार जगात १२ कोटी लोकांना हत्तीरोग रोगाची लागण झालेली आहे. त्यापैकी ४० टक्के हत्तीरोग रूग्ण भारतातच आहेत. या रोगाचे रूग्ण दगावत नसला, तरी त्यास अत्यंतिक शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
हा रोग झाल्यावर बरा होत नसल्याने रुग्णाची त्यातुन सुटका नसते. हत्तीरोगाचे बाह्य लक्षणे व अंडवृद्धी असे दोन प्रकार आहेत. अंडवृद्धीमुळे पुरूषांच्या वैवाहिक जीवनात अडथळा निर्माण होऊ शकतो.
भंडारा जिल्ह्यात ४ हजार ४३१ हत्तीरोगाने बाधिकत व्यक्ती आहेत. यात अंडवृद्धीचे ६७८ तर हत्तीरागाने ग्रस्त ३ हजार ७५३ रूग्ण आहेत. पवनी तालुक्यात हत्तीरोगाचे सर्वाधिक ८७६ रूग्ण असून सर्वात कमी ३६६ तुमसर तालुक्यात आहेत.
अंडवृद्धीचे सर्वाधिक १३७ रूग्ण साकोली तालुक्यात असून सर्वात कमी ४१ रूग्ण मोहाडी तालुक्यात आहेत. भंडारा शहरात अंडवृद्धीचे २९ रूग्ण असून तुमसर शहरात ७ व पवनी शहरात ६ रूग्ण तर हत्तीरोगाचे भंडारा शहरात ९७, तुमसर ४९ व पवनी शहरात ९८ रूग्ण आहेत.