जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:31+5:30
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान विक्रीची प्रतीक्षा करावी लागते. अवकाळी पावसाचा उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला फटका बसतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधारभूत धान खरेदी केंद्राची संख्या अपुरी असल्याने दरवर्षी धान विकताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. आठ ते दहा दिवस धान खरेदी होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर असतात. ही अडचण लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या मुंबई येथील बैठकीत घेण्यात आला. यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक धानही आधारभूत केंद्रावर विकला जातो. परंतु धान खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोेरे जावे लागते. बरेचदा शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आठ-आठ दिवस धान विक्रीची प्रतीक्षा करावी लागते. अवकाळी पावसाचा उघड्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या धानाला फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने मुंबई येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची बुधवारी बैठक अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी खासदार पटेल यांनी धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रामागे एक केंद्र देण्यात यावे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितींना सुद्धा हमी भाव धान खरेदी केंद्राची परवानगी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी ना.भुजबळ यांनी खरेदी विषयी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विभाग मंडळांना सर्व बाबींचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नवीन धान खरेदी केंद्र सुरु करुन धान खरेदी वाढविण्यात यावी, धान उत्पादन जास्त होणार असल्याने त्यानुसार बारदाना उपलब्धतेचे नियोजन करावे या अनुषंगाने सार्वजनिक वितरण प्रणालीचे योग्य व्यवस्थापन करावे अशी सूचनाही करण्यात आली.
बैठकीला खासदार प्रफुल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री अनिल देशमुख, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्ता तणपुरे, आमदार राजु कारेमोरे, मोहन चंद्रिकापुरे यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव आणि मार्केटिंग फेडरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वेळेत चुकारे मिळावे-प्रफुल पटेल
शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. केंद्रावर बारदाना व इतर सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच धानाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना धानाचे चुकारे वेळेत मिळावे या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना खासदार प्रफुल पटेल यांनी या बैठकीत केली.