चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्याही घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:58 AM2021-05-05T04:58:21+5:302021-05-05T04:58:21+5:30
भंडारा : मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाला. मात्र त्यानंतर चाचण्याच ...
भंडारा : मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाला. मात्र त्यानंतर चाचण्याच कमी झाल्याने रुग्णसंख्येतही घट दिसून येत आहे. जिल्ह्यातील गत चार दिवसांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास ही बाब स्पष्टपणे जाणवत आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ९०१८ इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत तीन लाख ४७ हजारपेक्षा जास्त नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५३ हजार १२७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर ९०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वधारत असला तरी चाचण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मृत्युदर ०१.७० इतका झाला आहे.
बॉक्स
ग्रामीण भागात टेस्टिंग कमीच
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर यावी यासाठी ठिकठिकाणी चाचणी केली जात आहे; मात्र ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात टेस्टिंगचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. गतवर्षी ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होते. मात्र यावेळी ग्रामीण क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढली आहे.
एप्रिल महिन्याच्या मध्यंतरी कोरोना चाचणींची संख्या वाढविण्यात आली होती. यातही ग्रामीण भागात आधी चाचण्या जास्त होत्या. मात्र त्यानंतर हळूहळू किटचा अभाव जाणवल्याने संख्या कमी कमी होत गेली. यामुळेच आज घडीला ग्रामीण भागात चाचणी कमीच होत असल्याचे जाणवत आहे. चाचणी होत असली तरी त्यात ॲंटिजेन चाचणीचे प्रमाण अधिक आहे.
बॉक्स
आरटीपीसीआरपेक्षा ॲंटिजेन तपासणी अधिक
जिल्ह्यात आतापर्यंत तीन लक्ष ४७ हजार ७९० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. मात्र या तपासणीत आरटीपीसीआरपेक्षा ॲंटिजेन तपासणीत सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे दिसून आले आहे. आजही आरटीपीसीआर चाचणी अल्पप्रमाणात होत असल्याचे दिसून येते.
ॲंटिजेन तपासणीत पॉझिटिव्हचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होते. मात्र गत दोन दिवसात चाचण्याच कमी झाल्याने रुग्णसंख्याही कमी झाली आहे.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या नऊ हजारांच्या वर असून, यातून होम क्वॉरण्टाइन असलेले रुग्ण मुक्त संचार करीत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही सध्यातरी उपाययोजना नसल्याने धोक्याची घंटा वाढणार काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गतवर्षी घरोघरी जाऊन विचारणा होत होती. यावेळी मात्र अतिरिक्त ताणामुळे ते शक्य झाले नाही.