रुग्णांची संख्या रोडावली, अधिकारी-कर्मचारी तणावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:32 AM2021-01-13T05:32:44+5:302021-01-13T05:32:44+5:30
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडानंतर तिसऱ्या दिवशी रुग्णालय परिसरात शुकशुकाट दिसत होता. रुग्णांची संख्याही रोडावली होती. अधिकारी ...
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांडानंतर तिसऱ्या दिवशी रुग्णालय परिसरात शुकशुकाट दिसत होता. रुग्णांची संख्याही रोडावली होती. अधिकारी - कर्मचारी प्रचंड तणावात दिसत होते. सुरक्षा रक्षक येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करूनच आतमध्ये सोडत असल्याचे दृश्य सोमवारी सकाळी १० वाजता येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रवेश केला तेव्हा स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात होते. कधी नव्हे ती स्वच्छता रुग्णालयाच्या आवारात आणि इमारतीतही दिसत होती. बाह्यरुग्ण नोंदणी कक्षासमोर केवळ पाच ते सहा व्यक्ती नोंदणी करताना दिसत होते. इतर वेळी येथे मोठी रांग लागलेली असते. अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कक्षांमध्ये दाखल होण्याची घाई करीत असल्याचे चित्र होते. त्यांच्या चेहऱ्यावर घटनेचा प्रचंड तणाव दिसत होता. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणीही एक शब्दही बोलायला तयार नव्हते. रुग्णांचे नातेवाईक इमारतीच्या आवारात गटागटाने चर्चा करीत असल्याचे दिसले. लोकमत चमूने छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस धावून आले. सुरक्षा रक्षकही पोहोचले. कशासाठी आले, फोटो कशासाठी काढता असे सांगून बाहेर जाण्याची विनंती केली. एकंदरीत जिल्हा रुग्णालय स्वच्छतेत अपडेट झाले असले तरी अवस्थेत मात्र फारशी सुधारणा दिसत नव्हती.