राज्यात शिक्षक समुपदेशकांची संख्या अत्यल्प
By admin | Published: November 22, 2015 12:23 AM2015-11-22T00:23:02+5:302015-11-22T00:23:02+5:30
राज्यात शिक्षक समुपदेशकांची संख्या अत्यल्प असल्याची कबुली दस्तुरखुद्द शिक्षण विभागाने दिली आहे.
भंडारा : राज्यात शिक्षक समुपदेशकांची संख्या अत्यल्प असल्याची कबुली दस्तुरखुद्द शिक्षण विभागाने दिली आहे. व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था मुंबई या संस्थेतून व्यवसाय मार्गदर्शन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील शिक्षक समुपदेशकांची संख्या ५३९ आहे.
राज्यातील एकूण शाळा, शिक्षक व विद्यार्थी संख्या विचारात घेता समुपदेशन करण्यासाठी पात्र तज्ज्ञ व्यक्तींची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे समुपदेशनाचा लाभ अत्यल्प विद्यार्थ्यांना होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सन २०१५-१६ पासून राज्यातील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कल चाचणी होणार आहे.
दहावी उत्तीर्ण झाल्यावर कोणत्या विद्या शाखेत प्रवेश घ्यायचा, त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. अनेकदा क्षमता नसताना एखादा अभ्यासक्रम निवडला जातो. भविष्यात त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्याला व त्याच्या पालकांनाही सहन करावे लागतात. त्यामुळे दहावीत शिकत असतानाच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल समजण्यासाठी आणि त्यांना करियरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी ही आॅनलाईन चाचणी होणार आहे. त्यातून अत्यल्प समुपदेशक आणि त्यांच्याकडून होणाऱ्या मर्यादित समुपदेशनावर उपाययोजना शोधण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येईल. या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण किंवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्र निवडीसाठी सहाय्य करून आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे.
राज्यातील समुपदेशकांची संख्या अत्यल्प असल्याने मानसिक त्रास वाढण्याची शक्यता असल्याने त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)